हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात महाविकास आघाडी सरकार फार काळ टिकणार नसल्याचे भाकीत करत भाजपमधील नेत्यांकडून वारंवार टीका करण्यात येत आहे. सध्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून राज्य सरकारला टार्गेट केले जात आहे. अशात आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा सूचक वक्तव्य केले आहे. विश्वासघाताने गेलेले सरकार मेहनतीने आताही येते. तसेच ती वेळ काही दिवसांचीच आहे, असे पाटील यांनी म्हंटले आहे.
कोल्हापुरात आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, आगामी काळात देशात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी याचीच सत्ता असणार आहे. ती वेळ काही लांब नाही. राज्यात आता पुन्हा भाजप सरकार येणार असल्याचे अप्रत्यक्षपणे त्यांनी सांगून टाकले.
राज्यात सध्या विधान परिषदेसाठी 6 ठिकाणी 10 डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे. कोल्हापुरातून सतेज पाटील यांच्या विरोधात भाजपकडून महाडिक यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वी चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत राज्य सरकारवर निशाना साधला.