हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे केल्या जात असलेल्या आंदोलनावरून भाजपकडून टीका केली जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र बंदबाबत प्रतिक्रिया दिली. राज्यात महाविकास आघाडी सरकारकडून जो महारासाहत बंद पुकारण्यात आला आहे तो पूर्णपणे फसलेला असल्याची टीका पाटील यांनी यावेळी केली आहे.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, उत्तर-प्रदेश येथील लखीमपूर खेरी येथे घटना घडलेली आहे. मात्र, महाराष्ट्रात आघाडी सरकारकडून या घटनेचा विषय प्रचंड लावून धरला जात आहे. घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. जी घटना घडली त्याची चौकशी, कारवाई होऊ शकते. मात्र, त्या घडलेल्या घटनेचा भाजपशी, उत्तर-प्रदेश सरकारशी, केंद्र सरकारशी काय संबंध आहे? हेच मला कळत नाही. केंद्रीय गृह राज्यमंत्र्याच्या मुलाने ही घटना केली, असा आरोप आहे. आता त्याला अटक झाली आहे. पुढे त्याची चौकशीही होईल, चौकशीतून काहीतरी निष्पन्न होईल.
पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “महाविकास आघाडी सरकारने दीड वर्षांपासून महाराष्ट्र कुलुपबंद केला. आता, महाराष्ट्र बंदच्या नावाखाली जनतेला घरात बसायला भाग पाडताहेत. राज्यातल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर आणि उत्तर प्रदेशातल्या शेतकऱ्यांविषयी कळवळा हे पुतनामावशीचं प्रेम म्हणजे आघाडी सरकारचं फक्त राजकारण.
महाविकास आघाडी सरकारने दीड वर्षांपासून महाराष्ट्र कुलुपबंद केला.आता,महाराष्ट्र बंदच्या नावाखाली जनतेला घरात बसायला भाग पाडताहेत.राज्यातल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर आणि उत्तर प्रदेशातल्या शेतकऱ्यांविषयी कळवळा हे पुतनामावशीचं प्रेम म्हणजे आघाडी सरकारचं फक्त राजकारण!#Nomaharashtraband
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) October 11, 2021
आघाडी सरकारकडून लखीमपूर येथील घटना घडल्यानंतरही हा विषय चालू ठेवणे आणि महाराष्ट्र बंदची हाक देणे हे न कळणारे आहे. वास्तविक पाहता आजचा महाराष्ट्र बंद पूर्णपणे फसलेला आहे. जो काही बंद आहे तो भीतीने आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या एका नेत्यांनी शिवसेनेला आवाहन केले की शिवसेना स्टाईल बंद करा. याचा एकच अर्थ होतो की, यांच्यात काहीच ताकद राहिलेली नाही. बंद करायला यांच्याकडे लोक नाहीत. व्यापाऱ्यांना विचारा लखीमपूरमध्ये काय घटना घडली? त्यांनाही या घटनेबाबत काहीच माहिती नाही, असे पाटील यांनी म्हंटले आहे.