हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील 65 साखर कारखान्यांच्या विक्रीची यादी जाहीर केली होती. या त्यांच्या यादीवरीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. अजित पवारांनी जाहीर केलेल्या सर्वच्या सर्व 65 साखर कारखान्यांची चौकशी करण्यात यांनी तसेच कारखान्यातील गैरव्यवहाराला मौन संमती देणाऱ्या त्या वेळच्या सत्ताधाऱ्यांची आणि मदत करणाऱ्या नेत्यांची करण्यात यावी, असेही पाटील यांनी म्हंटले.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, कोरेगाव येथील जरंडेश्वर साखर कारखान्याचे प्रकरण काळा पैसा पांढरा करण्याचे आहे व त्याची चौकशी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीमार्फत केली जात आहे. त्याची चौकशी करताना त्या विक्रीमध्ये महत्त्वाची भूमिका असलेल्या राज्य सहकारी बँकेची आणि त्या बँकेचे संचालक असलेल्या अजित पवार यांचीही चौकशीहि करण्यात यावी, अशी आमची आग्रहाची मागणी आहे.
सर्वच साखर कारखान्यांची कसून चौकशी व्हायलाच हवी. कारखान्यांची विक्री कमी किंमतीत झाली असल्याची तक्रार असल्यामुळे राज्य सहकारी बँक आणि बँकेचे संचालक उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही चौकशी करायला हवी. pic.twitter.com/WWdO0TV1A9
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) October 23, 2021
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी अनेक मुद्यांवर आपले परखड मत व्यक्त केले. तसेच त्यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनाही टोला लगावला. मंत्री नवाब मलिक यांनी त्यांना धमकीचा फोन आल्याची तक्रार केली आहे. मलिक यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की, राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. त्यामुळे मलिक यांनी केवळ तक्रार करण्यापेक्षा राजस्थानमधील सरकारच्या मदतीने धमकी देणाऱ्याचा शोध घेऊन त्याला शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करावेत, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.