हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाविकास आघाडीतील नेत्यांवर नेहमीच भाजप नेत्यांकडून अनेक हल्लाबोल केले जातात. कधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तर कधी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली जाते. मात्र आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “केंद्र सरकारने महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याची जी ऑफर दिली होती ना. ती न स्वीकारण्या इतके शरद पवार कच्च्या गुरुचे चेले नाहीत, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी पवारांना लगावला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. ते पुढे म्हणाले की, राष्ट्रवादीची सध्याची अवस्था पाहिली तर असे लक्षात येईल कि नाचता येईना अंगण वाकडे असे आहे. तुम्ही आमच्याबरोबर सरकार बनवा अशी ऑफर केंद्रातुन पवार यांना देण्यात आली होती. मात्र पुढे काय झाले हे पवारांनाच माहीत. ती ऑफर न स्वीकारण्या इतके पवार साहेब काही कच्च्या गुरूचे चेले नाहीत.
सत्ता स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारकडून पूर्ण तयारी करण्यात आली होती. केंद्रामध्ये सरकार असलेल्या पार्टीबरोबरच सत्ता स्थापन करण्याला शरद पवार यांनी प्राधान्य दिले असते. त्यामुळे आता सर्वसामान्य माणसाला हे काय म्हणतात. त्याचे काय अर्थ होतात हे कळतं, असा टोला पाटील यांनी लगावला.