मुंबई प्रतिनिधी | भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या कार्यकारणी सभेत बोलताना कार्यकर्त्यांना २८८ जागी अशी तयारी करा कि २८८ जागी भाजप निवडून येईल. या तयारीचा फायदा भाजपच्या मित्र पक्षांना देखील होणार आहे. त्याचप्रमाणे युती आणि जागा वाटपासंदर्भात निर्णय मुख्यमंत्री घेतील. मात्र आपण निवडणुकीच्या तयारीला लागा असा आदेश चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला आहे.
या कार्यक्रमाला राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, आशिष शेलार, मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोंढा, एकनाथ खडसे यांच्या सह भाजपचे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या पाच वर्षात ५० हजार कोटी पेक्षा जास्त पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीच्या प्रतिमेला तडा जाईल असे वर्तन माझ्या हातून होणार नाही. बुथ रचनेच महत्वाचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले यामुळेच २०१४ जिंकलो आता लोकसभा जिंकलो आणि विधानसभाही जिंकणार असा विश्वासही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा असता तर बारामती देखील भाजपनेच जिंकली असती. ईव्हीएममध्ये घोटाळा असेल तर सुप्रिया सुळेंनी राजीनामा द्यावाअशी जहरी टीका देखील चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. वंचितचा काँग्रेस राष्ट्रवादीला तोटा झाला आणि आम्हाला फायदा झाला असे म्हणणे देखील उचित ठरणार नाही. आमचा विजय फक्त नी फक्त बूथ स्तरावर उभारलेली बळकट यंत्रणा यामुळे झाला आहे असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.