सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
जत तालुक्यात भाजपने विधानसभेला नवा चेहरा द्यावा, असे भाजपच्या सर्व्हेतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजपने उमेदवार बदलावा अन्यथा पक्षाला अडचण येऊ शकते, असे मत भाजपचे नेते डॉ.रवींद्र आरळी यांनी व्यक्त केले. शिवाय विधानसभेसाठी भाजपकडून माझ्यासह आठ जण इच्छूक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. रवींद्र आरळी म्हणाले, खासदार संजय पटील यांच्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रचाराची धुरा सांभाळली. त्याचाच परिपाक म्हणून तालुक्यात त्यांना मताधिक्य मिळाले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जतमधून विद्यमान आमदार विलासराव जगताप, मी, तम्मनगौडा रवीपाटील यांच्यासमवेत आठजण इच्छुक आहेत. परंतु यामध्ये जिंकण्याची पात्रता असणे, त्यादृष्टीने प्रबळ दावेदार असायला हवा. पक्षाच्यावतीने जत विधानसभा मतदारसंघात सर्व्हे केला गेला आहे. त्यामध्ये नवीन चेहरा दिल्यास पुन्हा ही जागा पक्षाला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला गेला आहे.
भाजपला विधानसभा निवडणुकीत वातावरण चांगले आहे. पण त्यासोबतच अनेक कार्यकर्त्यांतून उमेदवार बदलाची मागणीही जोर धरू लागली आहे. भाजप-कॉंग्रेस आणि आता वंचित बहुजन आघाडीसह मैदानात उतरतील हे उघड आहे. यामध्ये सध्या तरी तालुक्यात भाजप प्रबळ आहे. केंद्र, राज्य शासनाच्या माध्यमातून मतदारसंघातील विकासकामांमुळे भाजपलाच पुन्हा तालुक्यात यश मिळणार हे उघड आहे. तरीही वंचित फॅक्टर निवडणुकीवर परिणाम करणार, हे उघड आहे. पक्ष भाजपने नवीन चेहरा दिल्यास विजय नक्की असल्याची खात्री डॉ.आरळी यांनी व्यक्त केली.