हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेस कडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असून आता भाजपने या निवडणुकीतुन माघार घेतली आहे. भाजपचे उमेदवार संजय उपाध्ये त्यांचा अर्ज मागे घेणार आहेत. त्यामुळे आता काँग्रेसच्या रजनी पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. अखेर भाजपने अर्ज मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर रजनी पाटील यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोण आहेत रजनी पाटील
रजनी पाटील ह्या वसंतदादा पाटील यांच्या मानसकन्या असून मूळच्या त्या सांगली जिल्ह्यातल्या. पुढे विवाहानंतर त्या मराठवाड्यात स्थाईक झाल्या. माजी क्रीडा राज्यमंत्री अशोक पाटील यांच्या त्या पत्नी. बीडमधून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. रजनी पाटील ह्या सध्या जम्मू आणि काश्मीरच्या काँग्रेस प्रभारी आहेत. त्या आधीही राज्यसभेवर होत्या. त्यानंतर आता त्यांना पुन्हा संधी देण्यात आलीय.