सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
संजयनगर मधील भाजपचे कार्यकर्ते व बांधकाम साहित्याचे विक्रेते सुभाष बुवा यांचा काल रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणावरून धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला. बुवा यांच्या खूनप्रकरणी गुंडविरोधी पथकाने दोघा संशयितांना पहाटे ताब्यात घेतले. इम्रान बंडूलाल शेख व रफिक बबलू शेख अशी त्यांची नावे आहेत.
शनिवारी रात्री संजयनगरमधील सूर्यनगर कॉलनीत रफिक शेख याने बुवा याना काम आहे असे सांगून तेथे बोलावून घेतले. बुवा तेथे आल्यावर काहींनी अंधाराचा फायदा उचलत बुवा यांच्यावर धारधार शास्त्राने जोरदार हल्ला चढवत त्यांच्या छातीवर, चेहऱ्यावर आणि मानेवर तब्बल ११ वार केले. ते रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर हल्लेखोर तेथून पसार झाले. याची माहिती मिळताच बुवा यांचे कुटुंबीय आणि तेथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. बुवा यांना उपचारासाठी तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी बुवा याना मृत घोषित केले.
त्यांच्या समर्थकांनी सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात मोठी गर्दी केली होती. गुरुवारी रात्री बुवा यांच्या मोटरची काच अज्ञाताने फोडली होती. याप्रकरणी संजयनगर पोलिसानी एकाला पकडले होते. काहींनी मध्यस्थी करून हे प्रकरण मिटवण्याचा सल्ला दिला. बुवा यांनीही प्रकरण मिटवण्यास होकार दिल्याने प्रकरणावर पडदा पडला होता. गुंडाविरोधी पथकाने संशयितांच्या शोधासाठी तात्काळ पथके पथके रवाना केली होती. पथकाने या गुन्ह्यातील संशयित निष्पन्न करून त्यांच्या ठिकाणाबाबत माहिती काढली. त्यानुसार दोघेजण कृपामयी जवळील मारुती मंदिर ते सूतगिरणीकडं जाणाऱ्या रस्त्यावर असल्याचे समजले. पथकाने तेथे जाऊन इम्रान शेख आणि रफिक शेख या दोघांना ताब्यात घेतले. त्या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. ताब्यात घेण्यात आलेले दोघेजण सराईत गुन्हेगार आहेत. त्यांना पुढील तपासासाठी संजयनगर पोलिसाच्या ताब्यात दिले आहे. दरम्यान खून नेमका कोणत्या कारणाने झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.