सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी यांनी निवेदन देत राजीनाम्याची मागणी केली.
निवेदनात म्हटले आहे की, कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीने 1993 बॉम्बस्फोटातील सहभागी गुन्हेगारांशी संबंधित मनी लॉडरिंग प्रकरणी अटक केली. कोर्टाने त्यांना 3 मार्चपर्यंत कोठडी दिली. अनिल देशमुखांचा राजीनामा ताबडतोब घेणारे, नवाब मलिकांच्या बाबतीत वेगळा निर्णय करत आहेत. विशिष्ट समुदायाला दुखावणे त्यांना जमणार नाही. पण महाराष्ट्रातील राष्ट्रीय विचारांची जनता है सहन करणार नाही.
राज्यातील देशातील सर्व नागरिकांच्या सुरक्षेचा हा प्रश्न आहे हा राष्ट्राच्या सुरक्षेचा विषय आहे. राष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे नवाब मलिकांचा राजीनामा होईपर्यंत भारतीय जनता पार्टी तर्फे निदर्शने केली जातील, आंदोलनाची तीव्रता वाढविली जाईल. गुन्हेगारांना पाठीशी घालणारे हे सरकार वठणीवर आणण्यासाठी आम्ही मोठा लढा उभारून तडीस नेण्यासाठी कटिबद्ध आहोत. १९९३ च्या बॉम्बस्फोटात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि राष्ट्रावर पुन्हा संकट येऊ नये या साठी आतंकवादी विचारसरणी ला पाठीशी घालणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात आणि राज्यभर आंदोलने करणार आहोत. तरी आपणास विनंती आहे की आपण ताबडतोब नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे.