सातारा | ‘भाजप सातत्याने ओबीसी समाजाच्या विरोधात राहिला असून, त्यांनी आम्हाला सत्तेबाहेर राहण्यासाठीच सतत खेळी केली. आता तर आमचे आरक्षण संपविण्याचाच त्यांचा डाव आहे. आम्ही त्यांचा हा डाव हाणून पाडणार,’ असा इशारा भाजपला देतच राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणाऱ्या अर्थखात्याचेही मागासवर्गीय आयोगाला सहकार्य मिळत नसल्याचा गंभीर आरोप राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी मंगळवारी सातारा येथे पत्रकार परिषदेत केला.
सातारा येथील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेस ओबीसी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संजय साळुंखे, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ कुंभार, काँग्रेसच्या अनुसूचित जाती-जमाती सेलचे जिल्हाध्यक्ष मनोजकुमार तपासे, नरेश देसाई आदी उपस्थित होते. दरम्यान, या पत्रकार परिषदेत माळी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच भाजपवरही सडकून टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसने मागासवर्गीय आयोगाला निधी न दिल्याने आयोगाची अवस्था दयनीय झाली असून, राष्ट्रवादीतील मराठा समाजाचे काही मंत्री व आमदारांनी मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करण्याची मागणी केली असल्याचा आरापेही माळी यांनी यावेळी केला.
‘ओबीसी समाजाच्या आरक्षणावरुन जाती-पातीचे राजकारण सुरु झाले असून केंद्र सरकारने रोहिणी आयोगाला इम्पिरियल डाटा देत असताना राज्याला देण्यास नकार दिला असल्याचा गंभीर आरोप माळी यांनी केला. ते म्हणाले, ‘भाजप 2024 पर्यंत ओबीसी समाजाचे आरक्षण शैक्षणिक, नोकरी व राजकारणातही संपविणार असल्याचे समोर आले आहे. भाजपकडून आरक्षण मुक्त भारत करण्याचा डाव सुरु असून तसे कामही त्यांनी सुरु केले आहे. देशात 54 टक्के ओबीसी समाज असतानाही आमच्यावर अन्याय होत आहे. याविरोधात पुढील काही दिवसात मुंबई-अहमदाबाद हा महामार्ग बंद करण्याबरोबरच प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करणार आहे.’