हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंद आंदोलन करण्यात आले. यावरून भाजपप्रमाणे भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. “शेजारच्या राज्यात घटना घडली तर त्याचं राजकारण करून हा बंद पुकारला गेला. या बंदचा मी निषेध करत आहे. ठाकरे सरकारच्या या बंदला जनता जुमानणार नाही,” अशी टीका पवार यांनी केली आहे.
महाराष्ट्र बंदच्या आंदोलनावरून भाजपच्या केंद्रीयमंत्री भरती पवार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांच्या, शेतकर्यांच्या अनेक प्रकारच्या वेदना आहेत. त्या समजून घ्यायला या राज्य सरकारकडे वेळ नाही, पण शेजारच्या राज्यात घटना घडली तर त्याचं राजकारण करणे मात्र चांगले जमते. त्यातूनच हा बंद पुकारला गेला आहे. या बंदचा मी निषेध करत आहे.
ठाकरे सरकारच्यावतीने आज करण्यात येत असलेल्या या आंदोलनास व बंदला महाराष्ट्रातील जनता कधीच जुमानणार नाही. कारण राज्यातील शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई दिली गेलेली नाही. अशा प्रकारे महाराष्ट्र बंद ठेवण्यापेक्षा या सरकारने महाराष्ट्राचे प्रश्न सोडवावेत, असा सल्ला केंद्रीय राज्यमंत्री पवार यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.