नवी दिल्ली । कोरोना व्हायरसविरोधात संपूर्ण जग लढा देत आहे. सध्या सगळयांचे लक्ष कोरोनाला रोखणारी लस बाजरात कधी उपलब्ध होणार याकडे लागले आहे. रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने बनवलेली लस मानवी परीक्षणामध्ये यशस्वी ठरलेली असतानाच जगासाठी आणखी एक आनंदाची बातमी येण्याचे संकेत मिळत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना लसी संदर्भात आज एक महत्त्वपूर्ण टि्वट केले आहे.
‘ग्रेट न्यूज ऑन व्हॅक्सीन्स’ असं टि्वट डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. ट्रम्प यांच्या कोरोना लसीसंदर्भांत इशारा करणाऱ्या या ट्विटने सध्या एकचं खळबळ निर्माण झाली आहे. कोरोना लसी संदर्भात चांगली बातमी असा त्या टि्वटचा काही जण अर्थ लावत आहेत. तर काही जण डोनाल्ड ट्रम्प लसी संदर्भात मोठी घोषणा करु शकतात असा कयास बांधत आहेत.
Great News on Vaccines!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) July 15, 2020
दरम्यान, अमेरिकेत वेगवेगळया कंपन्या करोनावर लस विकसित करत असून यात आघाडीवर असलेल्या मॉडर्ना कंपनीची लस पहिल्या फेजमध्ये यशस्वी ठरली आहे. मॉर्डना कंपनीने विकसित केलेल्या लसीची ४५ तंदुरुस्त स्वयंसेवकांवर चाचणी घेण्यात आली. या चाचणीमध्ये ही लस मानवी शरीरासाठी सुरक्षित असून रोगप्रतिकारक शक्तीला चालना देत असल्याचे दिसून आले आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे. कमालीची बाब म्हणजे या बातमीनंतर मंगळवारच्या सत्रात मॉर्डनाचा शेअर १५ टक्क्यापेक्षा जास्त वधारला होता.