सेना भाजप युतीचे सरकार आल्यास आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय पक्षांच्या बैठकांचा सपाटा सुरू आहे. त्यातच गुरुवारी (२६ सप्टेंबर) दिल्लीत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांवर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात युतीची सत्ता आली तर शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्याची तयारी भाजपने दर्शविली आहे. त्यामुळे युती झाल्यास युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे पुढच्या युती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असतील हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपतर्फे लढविण्यात येणाऱ्या जागांविषयी आणि शिवसेनेबरोबरील युतीबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. प्रत्येक विभागात आपल्या पक्षाचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी शिवसेनेने ज्या जागांची मागणी केली आहेत, त्यावरही बैठकीत चर्चा झाली. बैठक सुरू असताना दिल्लीतून दूरध्वनीवरून शिवसेनेच्या नेत्यांशी मुंबईत चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

सत्तेवर आल्यास शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्याची तयारी भाजपने दर्शविली आहे. मात्र, त्याबरोबर किमान १५० जागा लढविण्याचा भाजपने निर्णय घेतला आहे. दुपारी १ वाजता सुरू झालेली बैठक रात्री ९.३०ला संपली. यात मतदारसंघांनुसार नावांवर चर्चा झाली. पुढील आठवड्यात २९ किंवा ३० सप्टेंबरला केंद्रीय निवडणूक समिती आणि संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर महाराष्ट्रातील भाजपच्या जागांची अधिकृत घोषणा करण्यात येईल. अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या बैठकीचे पडसाद आता मुंबईतही दिसून आले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्या (२८ सप्टेंबर) शिवसेनेची एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे.

यावेळी उद्धव ठाकरे राज्यातील पदाधिकारी आणि इच्छुकांशी संवाद साधतील. युती झाल्यास पक्षात उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या जास्त असल्याने बंडखोरी होण्याच्या शक्यतेने ‘डॅमेज कंट्रोल’साठी पक्षनेतृत्वाने खबरदारी म्हणून ही बैठक बोलावण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. कारण, युतीत निवडणूक लढवताना पक्षाच्या वाट्याला येणाऱ्या मर्यादित जागांवर उमेदवारी देताना पक्षनेतृत्वाला मोठी कसरत करावी लागणार आहे.