लष्कराला बोलवावं लागेल अशी वेळ येऊ देऊ नका-अजित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनामुळ जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या संचारबंदीच्या काळात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटना कदापिही सहन केल्या जाणार नाहीत, असे हल्ले करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.

पोलिस आणि नागरिक दोघांनीही स्वयंशिस्त, संयम पाळावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. ‘लॉकडाऊन’च्या अंमलबजावणीसाठी अमेरिकेत लष्कराची मदत घेण्यात आली आहे. आपल्या राज्यात ती वेळ येऊ न देणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. बीडमध्येही पोलिसांवर हल्ला करण्यात आला. मालेगावात लोकप्रतिनिधींकडूनच वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली. अशा घटनांमुळे ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्याला धक्का बसत आहे. जनतेनं ‘कोरोना’चं गांभीर्य ओळखून वर्तन ठेवावं, पोलिसांना सहकार्य करावं, असं आवाहनही अजित पवार यांनी केलं आहे.

राज्यात २१ दिवसांचा ‘लॉकडाऊन’ असला तरी दूध, भाजीपाला, फळे, औषधे, अन्नधान्य, कुकिंग गॅसचा आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित सुरू आहे. तरीही बाजारात खरेदीसाठी होणारी नागरिकांची गर्दी चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू घरपोच किंवा सोसायटी परिसरात उपलब्ध करण्याबाबत स्थानिक स्वराज संस्थांनी नियोजन करावे, अशा सूचनाही अजित पवार यांनी दिल्या. बारामती, वाई शहरात अशी व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. शहरात एकाकी राहत असलेले ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रस्त्यावर राहणारे गरीब, बेघर यांच्या भोजनाची सोय करण्यासाठी समाजानं, स्वयंसेवी संस्थांनी पुढं यावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com