बार्शी प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे आमदार माजी मंत्री दिलीप सोपल यांचे राष्ट्रवादीला रामराम घालण्याचे निश्चित झाले असून येत्या काही दिवसातच ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेना भाजप युतीमध्ये बार्शीची जागा शिवसेनेकडे आहे. तर सोपल यांचे प्रतिस्पर्धी राजेंद्र राऊत भाजपमध्ये आहेत. त्यामुळे दिलीप सोपल शिवसेनेत जाऊन राजेंद्र राऊत यांची कोंडी करण्याची तयारी करत आहेत.
दिलीप सोपल यांनी आज राष्ट्रवादीचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी येत्या २८ ऑगस्टला शिवसेनेत जाणार असल्याचे जाहीर देखील केले आहे. त्यांच्या राष्ट्रवादी सोडण्याने सोलापूर जिल्ह्यात जनाधार असणारा सर्वसमावेशक चेहराच राष्ट्रवादीकडे राहिला नाही अशीच असेच म्हणणे उचित ठरणार आहे. कारण मोहिते पाटील भाजपमध्ये गेले. तर १९९५ पासून आज तागायत माढ्यातून राष्ट्रवादीचे आमदार असणारे बबन शिंदे देखील भाजपच्या वाटेवर आहेत. त्याच प्रमाणे रश्मी बागल यांच्या रूपाने बागल गटाने देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडे व्यापक जनाधार असणारा चेहराच आता उरला नाही.
दरम्यान दिलीप सोपल शिवसेनेत गेल्यास त्यांना युतीचे तिकीट मिळाल्यानंतर राजेंद्र राऊत यांना अपक्ष निवडणूक लढावी लागणार आहे. त्यामुळे बार्शी विधानसभेची निवडणूक महाराष्ट्रात काटे की टक्कर म्हणून गाजणार आहे. दिलीप सोपल यांचा मतदारसंघात लोकांमध्ये संपर्क कमीच असतो. तसेच ऐन निवडणुकीच्या काळात डावपेचाच्या आधारावर ते बाजी मारून जातात. यावेळी राष्ट्रवादीच्या तिकिटावर आपण निवडणूक जिंकणार नाही हे लक्षात आल्यानेच शिवसेनेत प्रवेश करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे लोकांमध्ये जनाधार ढासळले दिलीप सोपल शिवसेनेच्या संजीवनीवर पाच वर्षांसाठी राऊत यांना शिकस्त देऊन निवडून जातात का हे बघावे लागेल.