मुंबई प्रतिनिधी | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावली असून २२ ऑगस्टला हजर राहण्याचा आदेश दिला आहे. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरेंना ईडीची नोटीस येणार हे मला आधीच माहीत होते. तसे मी त्यांचे नेते बाळा नांदगावकर यांनादेखील सांगितले होते. ही माहिती बाळा यांनी राज ठाकरेंपर्यंत पोहचवली की नाही याची मला कल्पना नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
सत्ताधारी पक्षात न जाणा-यांच्या मागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लावला जात आहे. राज ठाकरे यांनी ईव्हीएम विरोधात आवाज उठवल्यानंतर त्यांच्यावरही ही कुरघोडी केली जात आहे. भाजपकडून ब्लॅकमेलिंगचं राजकारण केलं जातं; पण राज ठाकरे या सगळ्याला बळी पडणार नाहीत, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तसेच, मी असल्या ईडीच्या नोटिसीला भीक घालत नाही, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. २२ तारखेला राज ठाकरे यांची ईडीच्या कार्यालयात चौकशी होणार आहे.