नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरीची एक विचित्र घटना समोर आली आहे. यामध्ये एका चोराने घरफोडी केल्यानंतर घरात काहीच न मिळाल्याने, रागाच्या भरात मालकासाठी एक चिठ्ठी लिहिली. चोरट्याचे हे कृत्य पाहून पोलीससुद्धा हैराण झाले आहेत. या प्रकरणी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीची एक घटना घडली आहे. या घटनेत आरोपी चोराला घरात काहीच मुद्देमाल न सापडल्याने तो भयंकर चिडला. त्यानंतर त्याने त्या घरातून निघण्याच्या अगोदर घरमालकासाठी एक चिठ्ठी लिहिली. या चिठ्ठीमध्ये त्याने “घरातून कोणताही मुद्देमाल चोरीला गेला नाही” असं म्हटलं आहे. शिवाय संबंधित चिठ्ठीत त्याने घरमालकाची लायकी काढत त्याला भिकारी म्हंटले आहे.
घटनास्थळी ही चिठ्ठी आढळल्यानंतर पोलिसांनी पोलिसांनी डोक्याला हाथ लावला. चोरट्याची ही चिठ्ठी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या प्रकरणावर लोकांनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे घरात चोरी झाली असून तीन हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असल्याची तक्रार घरमालकाने पोलिसांत दिली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेण्यात येत आहे.