धक्कादायक ! कोविड सेंटरमधील नर्सचा ब्रदरनेच केला विनयभंग

Crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सावरगाव : हॅलो महाराष्ट्र – राज्यात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. त्यामध्येच आता महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. अशीच एक घटना लोखंडी सावरगाव येथील कोविड सेंटरमध्ये घडली आहे. यामध्ये एका नर्ससोबत काम करणाऱ्या ब्रदरने तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात ब्रदरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण
पीडित महिला लोखंडी सावरगावच्या रुग्णालयात कार्यरत आहे. त्या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार दीड महिन्यापासून त्या राहत असलेल्या रूमचा रात्री अपरात्री कोणीतरी दरवाजा ठोठावून निघून जात असे. यानंतर त्यांनी त्यावर पाळत ठेवली असता त्यांच्यासोबत ब्रदर म्हणून काम करणारा अर्जुन अनंत फड हा दरवाजा ठोठावत आहे असे आढळून आले. यानंतर दुसऱ्या दिवशी त्या महिलेने अर्जुनला जाब विचारला असता त्याने तुमच्यासोबत लग्न करायचे आहे, असे सांगितले. यानंतर पीडितेने आपण विवाहित असल्याचे सांगितले. तसेच यापुढे त्रास देऊ नको, असे बजावले होते.

मात्र त्यानंतरदेखील अर्जुन याने तिचा पाठलाग करणे चालूच ठेवले. तसेच काहीतरी कारण काढून तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करून तिला त्रास देत असे. यादरम्यान मंगळवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास पीडिता ड्युटीवरून घरी परतली असताना अर्जुनने तिच्या घरात घुसून तिचा विनयभंग केला. त्यानंतर त्या महिलेने आरडाओरडा करण्याची धमकी दिल्यावर अर्जुनने तिला ठार मारण्याची धमकी दिली आणि तिकडून निघून गेला. या प्रकरणी पीडितेने अर्जुन फड याच्यावर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय मोनाली पवार करत आहेत. या प्रकरणातील आरोपी सध्या फरार असून त्याला अजून अटक करण्यात आलेली नाही.