नवी दिल्ली । कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेच्या काळात केंद्र सरकार 1 फेब्रुवारी 2022 रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहे. यामुळे एकीकडे लोकं दिलासा मिळण्याच्या आशेवर बसले आहेत तर दुसरीकडे, सरकार त्यांना धक्का देऊ शकेल. आगामी बजटमध्ये सरकार स्मार्टफोनसह जवळपास 50 वस्तूंच्या किमतीत वाढ करू शकते. अर्थव्यवस्था आणि सध्याची आर्थिक स्थिती पाहता सरकार हे पाऊल उचलू शकते, असे उद्योगातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
देशांतर्गत उद्योगांना दिलासा देण्यासाठी सरकार 2022 च्या अर्थसंकल्पात परदेशातून आयात होणाऱ्या सुमारे 50 वस्तूंवर आयात शुल्क वाढवू शकते. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल गुड्स, केमिकल आणि हँडक्राफ्ट सारख्या उत्पादनांचा समावेश आहे. आयात शुल्क वाढवल्यास त्याचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
आयात शुल्क 10 टक्क्यांपर्यंत वाढू शकते
सूत्रांचे म्हणणे आहे की,” चीन आणि इतर देशांकडून $ 56 अब्ज किमतीच्या उत्पादनांच्या आयातीवर आयात शुल्क लागू केले जाऊ शकते. ज्या वस्तूंवर आयात शुल्क 5 ते 10 टक्क्यांनी वाढवता येईल अशा वस्तूंची निवड केली गेली आहे. सरकारच्या या पाऊलामुळे अत्यावश्यक वस्तूंच्या आयातीवर अंकुश ठेवण्यास मदत होणार आहे. यासोबतच देशात उत्पादनाला प्रोत्साहन दिले जाईल. त्यामुळे रोजगाराच्या आघाडीवरही दिलासा मिळू शकतो.”
‘या’ वस्तू महाग होऊ शकतात
मोबाइल फोन चार्जर, इंडस्ट्रियल केमिकल्स, दिवे, लाकडी फर्निचर, मेणबत्त्या, दागिने आणि हॅण्डक्राफ्ट यांसारखी उत्पादने जास्त सीमाशुल्क आकारल्यानंतर महाग होऊ शकतात. याशिवाय, स्मार्टफोन उत्पादकांना चार्जर्स, व्हायब्रेटर मोटर्स आणि रिंगर्ससारखे भाग आयात करणे महाग होईल.
‘या’ विदेशी कंपन्यांना बसू शकतो फटका
सरकारच्या ‘या’ निर्णयाचा टेस्ला आणि स्वीडिश फर्निचर कंपनी IKEA सारख्या कंपन्यांवरही परिणाम होऊ शकतो. दोन्ही कंपन्यांनी आधीच सांगितले आहे की, त्यांच्यासाठी सर्वात मोठे आव्हान भारतातील जास्त असलेले सीमा शुल्क आहे.