हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : काल दिवसभरात ईडी व सीबीआय कडून राज्यात ठिकठिकाणी छापेमारी करत दोन मोठ्या कारवाया करण्यात आल्या. त्यामधे एक परिवहनमंत्री अनिल परब याची चौकशी तर दुसरे व्यवसायिक अविनाश भोसले यांना अटक. काल पुण्याचे बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली असून आज त्यांना विशेष कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
व्यावसायिक अविनाश भोसले यांची यापूर्वीही विविध प्रकरणामध्ये चौकशी करण्यात आली होती. आज अखेर त्यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली. डीएचएफएल घोटाळ्यात (DHFL) त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. याच प्रकरणात आता त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. हे मूळ प्रकरण 2018 सालातील आहे. त्यावर्षी एप्रिल ते जूनच्या काळात हजारो कोटी रुपये एका खात्यातून दुसऱ्या खात्यात वळवण्यात आले होते.
त्यात मोठ्या उद्योजकांच्या कंपन्यांचा सहभाग होता. यात अविनाश भोसले, संजय छाब्रिया, बलवा व गोएंका यांचा समावेश होता. या प्रकरणी एप्रिलच्या अखेरीस सीबीआने छापेमारीही केली होती. या प्रकरणाने सध्या राज्याच्या राजकारणात खळबळ माजवली आहे. कारण अविनाश भोसले यांचे राजकीय संबंध असल्याचे बोलले जाते.
नेमकं प्रकरण काय?
येस बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राणा कपूर यांनी डीएचएफएलमध्ये 3700 कोटी रुपये कर्ज रोख्यांतून गुंतवले होते. यात राणा यांना 600 कोटींची दलाली मिळाल्याचे समोर आले होते. त्यानंतर डीएचएफएलने हे पैसे छाब्रिया यांच्या रेडियस ग्रुप, भोसले यांच्या इन्फ्रा लिमिटेड आणि बलवा आणि गोएंकाच्या कंपनीत वळते केले होते. त्यानंतर छाब्रियांना अटक करताच भोसले, बलवा आणि गोएंका यांच्यावर सीबीआयने छापेमारी केली होती. डीएचएफएल म्हणजेच दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने येस बँकेकडून 750 कोटींचे कर्ज घेतले होते. पण त्याचा वापरच करण्यात आला नाही, असे तपासात समोर आले होते.
भोसलेंचा राजकीय नेत्यांशीही संबंध?
अविनाश भोसले हे फक्त व्यावसायिक नसून त्यांचा अनेक राजकीय नेत्यांशी आहे. कारण अविनाश भोसले हे मंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भोसले यांचेही संबंध चांगले असल्याचे बोलले जाते. त्यामुळे आता राजकीय चर्चांनाही उधाण आले आहे. दिवसभरात इकडे शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर ईडीचे धाडसत्र सुरू होते. अशात तिकडे अविनाश भोसले यांच्यावरही मोठी कारवाई झाल्याने केंद्रीय तपास यंत्रणांनीच आजचा दिवस चर्चेत राहिला आहे.