जाणून घ्या बुलढाण्याचे नाव सातासमुद्रपार नेणाऱ्या राजूचा लोणार ते लंडन व्हाया यवतमाळ प्रवास

Raju Kendre
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बुलढाणा : हॅलो महाराष्ट्र – समोर आलेल्या संकटावर मात करत लोणार सरोवराच्या भूमीतून लंडनच्या विद्यापीठात शिवेनिंग शिष्यवृत्ती साठी निवड होण्याची संधी पिंप्री खंदारे येथील राजू केंद्रे या 23 वर्षीय तरुणाला मिळाली आहे. आपण नेहमीच म्हणतो की प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे त्याच्या संघर्षाचा इतिहास असतो. असाच काहीसा प्रवास राजू जिजाबाई आत्माराम केंद्रे या तरुणाचा आहे. लंडनची शिवेनिंग शिष्यवृत्ती ही अत्यंत मानाची स्कॉलरशिप मानली जाते. आणि या स्कॉलरशिप साठी राजू केंद्रे याची निवड झालीय.या स्कॉलरशिपसाठी 160 देशांतील 63 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. देशासह समाजात बदल घडवू पाहणाऱ्या तरुणांना इंग्लंडमध्ये उच्चं शिक्षण घेण्यासाठी जवळपास 45 लाख रुपयांची स्कॉलरशिप मिळते. राजूला जगातील 18 नामांकित विद्यापीठाने आपल्या विद्यापीठात प्रवेश घेणयासाठी आमंत्रित केले असून, लोणार तालुक्यातील पिंप्री खंदारे ते लंडन हा शैक्षणिक प्रवासाचा टप्पा राजूनं गाठलाय. यामुळे महाराष्ट्र आणि देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

नामांकित शिक्षण संस्थांतून शिक्षण
राजू केंद्रे चा जीवन प्रवास हा थक्क करणारा असून अवघ्या हजार बाराशे लोकसंख्या असलेल्या गावात राजू राहतोय. राजूने शिक्षण टाटा सामाजिक विज्ञान संस्थेसारख्या नामांकित संस्थेत ग्रामीण विकास विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेय. मेळघाट सारख्या दुर्गम भागात तळमळीने काम करणारा राजू आता मात्र नव्या वळणावर प्रवासाला सुरुवात करतोय. तो जगातील टॉप 100 विद्यापीठातील इंग्लंडच्या विद्यापीठात शिक्षाणासाठी निघालाय. पद्व्यूत्तर शिक्षण झाल्यावर राजुला महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री फेलोशिप सुद्धा मिळालीय. समाजकार्य महाविद्यालयात प्राध्यापक म्ह्णून काम करत असताना नेट सेट सारख्या परीक्षा ही पहिल्याच झटक्यात उत्तीर्ण केल्या. तर या तरुणाने आय – पॅक सारख्या राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या संस्थेसोबत ही काम केलेय.

राजूच्या निवडीचा आई वडिलांना आनंद
राजूच्या घरची परिस्थिती तशी जेमतेम आहे.आई – वडील शेतकरी असून त्यांचं राहणीमान अगदी साधं आहे. मात्र, आपल्या दोन्ही मुलांवर चांगले संस्कार या शेतकरी दाम्पत्यांनी केलेत. राजूचा मोठा भाऊ सुद्धा सिक्युरिटी संस्थेत नोकरीला आहे. तर, आता राजूला सुद्धा शिकवायचे आणि त्याला त्याच्या पाययावर उभे करायचे म्हणून आई वडिलांनी शेतीत काबाड कष्ट करून राजुला शिकविले. त्यामुळे राजू आज छोट्याशा गावातून लंडनला जातोय याचा त्याच्या आई वडिलांना सार्थ अभिमान आहे. शिवाय आमच्या राजू सारखे अनेक राजू तयार व्हावेत अशी इच्छा राजूचे वडील आत्माराम केंद्रे आणि आणि आई जिजाबाई केंद्रे यांनी व्यक्त केलीय.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
राजूने मागील तीन ते चार वर्षात 100 युवकांना देशातील चागंल्या कॉलेज किंवा विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी मार्गदर्शन ही केलेय. राजू करिअर विषयी मार्गदर्शन ही करतो. शिक्षणाच्या पारंपरिक चौकटी ओलांडून ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये नवा दृष्टिकोन आणि आत्मविश्वास निर्माण करणायचा प्रयत्न ही राजू करत असतो. आई -वडील जरी शेतकरी असले तरीही शिक्षणाच्या प्रवाहात अनेकांना आणायचे काम राजू केंद्रे यांनी केले असून त्याचा आदर्श इतर युवकांनी घेण्याची गरज आहे.

राजू केंद्रे यांचे समाजकार्य
राजू केंद्रे याने यवतमाळच्या सावित्री ज्योतिबा समाजकार्य महाविद्यालात अतिथी प्राध्यापक म्हणून काम करत असताना ‘एकलव्य अ‍ॅकेडमी नावाने शैक्षणिक चळवळ सुरु केली. मुख्यमंत्री फेलाशिपमध्येही त्याने यवतमाळ जिल्ह्यात अनेक पारधी बेड्यांवर काम केले. सध्या तो यवतमाळातून एकलव्य चळवळीद्वारे शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना ना मुख्य प्रवाहात आणण्याचे आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याना सर्व प्रकारची मदत करतो. या विद्यार्थ्यांसाठी अडगळीतील पुस्तकं संकलन करून ती गरजूंना देण्याचा त्याचा उपक्रम अनेक विद्यार्थ्यांना उपयोगी पडत आहे.ब्रिटनमध्ये शिकून परत मायदेशी येऊन काम करू पाहण्याऱ्यांना नेतृत्वगुण असलेल्या विद्यार्थ्यांनाच ही शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती मिळविणारा राजू हा कदाचित पहिला असा विद्यार्थी असावा जो पदवीपर्यंत मराठी माध्यमात आणि पदवीनंतर मुक्त विद्यापीठातून शिकलेला आणि भटक्या प्रवर्गातून आलेला आहे. त्याने एक वर्षापूर्वी या शिष्यवृत्तीकरीता तयारी सुरू केली होती. आजपर्यंत त्याला जागतिक स्तरावरील १८विद्यापीठांच्या विविध मास्टर्स अभ्यासक्रमासाठी ऑफर आल्या आहेत. यातली बहुतेक विद्यापीठे आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार पहिल्या २०० मधील आहेत आणि नऊ विद्यापीठे पहिल्या १०० मधील आहेत. या विद्यापीठांत मास्टर्सचे शिक्षण पूर्ण करायला वर्षाला जवळपास ४० लाख रुपये लागतात.

या शिष्यवृत्तीमुळे राजू केंद्र याला यापैकी कोणत्याही विद्यापीठात शिक्षण घेता येणार आहे. परदेशातून शिक्षण घेऊन परतल्यानंतर आपल्यासारख्या अभावाचे जगणे जगणाऱ्यांना आणि शैक्षणिक संधी नसणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा शिष्यवृत्तींच्या माध्यमातून परदेशात शिक्षणासाठी पाठविण्याचा निश्चय केला असल्याचे राजू केंद्र याने सांगितले. राजूचा लोणार ते लंडन व्हाया यवतमाळ हा प्रवास संघर्षातून पुढे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे, अशी प्रतिक्रिया त्याचे यवतमाळ येथील मार्गदर्शक प्रा. घनश्याम दरणे यांनी व्यक्त केली.