कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कमी कालावधीत जादा पैसे मिळतात, या आशेवर अलीकडे शेतकरी भाजीपाल्याच्या, पालेभाज्यांच्या पिकाकडे वळले आहेत. मात्र, त्या पिकांचे दर हे बाजारपेठेत मालाची आवक किती होते, यावर अवलंबून राहत आहेत. सध्या बाजारपेठेत भाज्यांचे दर गडगडले आहेत. त्यात कोबीचा दर तर एक रुपया किलोवर आला आहे. बाजारातील हा दर आंबागोळी आणि चॉकलेट पेक्षाही कमी झाला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी कोबीची लागण मोठ्या प्रमाणात केली. त्यातून त्यांना चार पैसे जादाचे मिळतील अशी आशा होती. मात्र, सद्याचे चित्र हे उलटे पहायला मिळत आहे. बाजारपेठेत कोबीची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. त्यामुळे कोबीला केवळ एक रुपये किलो एवढा दर मिळत आहे. दोन किलोच्या कोबीचा गड्डा फक्त दोन रुपयांना विक्रेत्यांना विकावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. मोठी मेहनत घेऊन केलेले कष्ट दर गडगडल्याने मातीमोल झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोबीसाठी घातलेले पैसेही निघत नाही. परिणामी त्यांचा खर्चही शेतकऱ्यांच्या अंगावर पडला आहे. बाजारपेठेत दरच मिळत नसल्याने बाजारपेठेत कोबी नेऊनही तोट्यात जात आहे. त्यामुळे कोबी उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडल्यासारखी स्थिती झाली आहे.
भाजीपाला केल्याने शेतात घातलेला पैसा लवकर मिळेल, या आशेवर आम्ही कोबी शेतात केला होता. मात्र सध्या कोबीचा दोन किलोचा गड्डा केवळ दोन रुपयांना विकावा लागत आहे. शेतातून कोबी तोडणी, त्यांची वाहतूक करून बाजारपेठेत नेणे हा खर्च केल्यास काहीच पैसा हातात राहत नाही. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने आम्ही आता गावात फुकट कोबी वाटत आहे. अस काले येथील शेतकरी शिरीष देसाई यांनी सांगितलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’