नवी दिल्ली । गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या आर्थिक बळासाठी ई-श्रम पोर्टल लाँच केले असून आतापर्यंत 20 कोटी 96 लाखांहून अधिक कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केली आहे. काल एका दिवसात 30 लाखांहून अधिक नोंदणी झाली. सरकारने या पोर्टलद्वारे देशभरात पसरलेल्या सुमारे 38 कोटी कामगारांना जोडण्याचे काम सुरू केले आहे. जेणेकरुन असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचा डाटा तयार करून त्यांना सरकारी योजनांशी जोडता येईल.
ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करणाऱ्या कामगाराला ई-श्रम कार्ड जारी केले जाते, ज्याच्या मदतीने कामगार देशात कुठेही, केव्हाही विविध सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घेऊ शकतो.
कोण कोण नोंदणी करू शकतो ?
ई-श्रम कार्ड फक्त असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी आहे. कोणताही कामगार जो घरगुती कामगार, स्वयंरोजगार कामगार किंवा असंघटित क्षेत्रातील पगारदार कामगार आहे आणि ESIC किंवा EPFO चा सदस्य नाही, त्याला असंघटित कामगार म्हणतात. असंघटित क्षेत्रातील कामगारांमध्ये बांधकाम कामगार, स्थलांतरित कामगार, रस्त्यावरील विक्रेते आणि घरकामगार यांचा समावेश होतो.
असंघटित क्षेत्रामध्ये वस्तू आणि सेवांच्या उत्पादन आणि विक्रीमध्ये गुंतलेल्या आस्थापनांचा समावेश होतो. या आस्थापनांमध्ये 10 पेक्षा कमी कामगार काम करतात. ही आस्थापने येथे काम करणाऱ्या कामगारांना ESIC आणि EPFO सारख्या सुविधा देत नाहीत.
शेतकरी देखील नोंदणी करू शकतात का ?
शेतकऱ्यांबाबत, ई-श्रम पोर्टलवर हे स्पष्ट करण्यात आले आहे की, केवळ शेतमजूर आणि भूमिहीन शेतकरीच ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यास पात्र आहेत. स्वत:ची जमीन असलेल्या शेतकऱ्यांचा या योजनेत समावेश नाही.
कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत ?
ई-श्रम योजनेअंतर्गत कामगारांना 2 लाखांपर्यंतचा अपघाती विमाही दिला जातो. ई-श्रम कार्ड योजनेच्या माध्यमातून भविष्यात लाभार्थ्यांना पेन्शनचा लाभ देण्याचीही सरकारची तयारी आहे. लोकांना ई-श्रम कार्डद्वारे उपचारासाठी आर्थिक मदतही दिली जाईल. गर्भवती महिलांना त्यांच्या मुलांच्या पालनपोषणासाठी पैसे दिले जातील. घरबांधणीसाठी शासनाकडून निधी दिला जाणार आहे. मुलाच्या शिक्षणासाठीही सरकार आर्थिक मदत करेल. या योजनेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ थेट खात्यात जमा केला जाणार आहे.
पोर्टलवर रजिस्टर्ड कामगार अपघाताला बळी ठरल्यास, मृत्यू झाल्यास किंवा पूर्ण अपंगत्व आल्यास 2 लाख रुपयांची रक्कम दिली जाईल. जर कामगार अंशतः अपंग असेल तर त्याला या विमा योजनेंतर्गत एक लाख रुपये मिळतील.
नोंदणी कशा प्रकारे करता येईल ?
16 ते 59 वयोगटातील कोणताही कामगार ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करू शकतो. ई-श्रम पोर्टल http://eshram.gov.in वर किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देऊन नोंदणी करता येते. ई-श्रम कार्डशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी, टोल फ्री क्रमांक 14434 वर कॉल केला जाऊ शकतो.
ई-श्रम पोर्टलवर नोंदणीसाठी, कामगाराला नाव, व्यवसाय, पत्ता, शैक्षणिक पात्रता, कौशल्य, आधार कार्ड, बँक खाते क्रमांक आणि मोबाइल क्रमांक यासारखी माहिती भरावी लागेल. तुम्ही नोंदणीसाठी आधार क्रमांक टाकताच, तेथील डेटाबेसमधून कामगाराची सर्व माहिती आपोआप पोर्टलवर दिसेल.
12 अंकी युनिव्हर्सल अकाउंट नंबर
ई-श्रम कार्डमध्ये 12-अंकी युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजेच UAN असेल. हे कार्ड देशात सर्वत्र व्हॅलिड असेल. UAN क्रमांक हा पर्मनन्ट नंबर असेल म्हणजेच एकदा दिल्यानंतर तो बदलता येणार नाही. ई-श्रम कार्ड आयुष्यभर व्हॅलिड आहे.