भरधाव कार कोसळली उड्डाणपूलाच्या कॉलमच्या खड्ड्यात

औरंगाबाद | वाळूज एमआयडीसी कंपनीतील ड्युटी संपवून घरी निघालेल्या व्यक्तीची गाडी बीड बायपासवरील एमआयटी कॉलेज चौकात उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपूलाच्या कॉलमसाठी खोदलेल्या 25 फुट खोल पाण्याने भरलेल्या खड्ड्यात कोसळली, काल सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. दरम्यान दोन जणांच्या सतर्कतेमुळे गाडीतील व्यक्तींचा जीव वाचवण्यात यश आले आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीचे कामगार भगवान कोंडके (55, रा. गादीया विहार) हे महानुभाव आश्रम रस्त्याकडून शहानूरमिया दर्गाकडे आपल्या चारचाकीने (एम एच 20, एजी 4085) जात होते. दरम्यान एमआयटी कॉलेज रस्त्याच्या मध्यभागी उड्डाणपूलाचे काम सुरू असल्याने पत्रे लावलेले आहेत. अंधार असल्याने ते पत्रे कोंडके यांना दिसले नाही. गाडी भरधाव असल्याने पत्र्याला धडकून थेट खड्डयात कोसळली. हा खड्डा पाण्याने भरलेला असल्याने कोंडके यांना इजा झाली नाही. मात्र गाडीचे दरवाजे लॉक झाल्याने त्यांना बाहेर येता येत नव्हते.

अपघाताचा आवाज होताच परिसरातील रफिक शेख आणि त्रिमूर्ती गॅरेजचे चालक प्रकाश पेठवडजकर यांनी खड्ड्याकडे धाव घेत, खड्ड्यात उतरून उजव्या बाजूची काच फोडून कोंडके यांना बाहेर काढले. यानंतर काही वेळातच कार पाण्यात बुडाली. काही वेळातच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर क्रेनने गाडी बाहेर काढण्यात आली.

You might also like