हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्याशी संबंधित असलेली दिशा सालियान प्रकरणात CBI ने आज एक नवा आणि धक्कादायक खुलासा केला आहे. दारूच्या नशेत तोल जाऊन दिशा सालियनचा मृत्यू झाला, असे सीबीआयने तपासानंतर सादर केलेल्या अहवालात म्हंटले आहे.
दि. 8 जूनच्या मध्यरात्री मुंबईतील मालाड येथील गॅलेक्सी रीजेंट इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून 28 वर्षीय दिशा पडली होती. सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह वांद्रे येथील भाड्याच्या घरात सापडण्याच्या पाच दिवसांपूर्वी दिशाचा मृत्यू झाला. दिशा सालियन मृत्यू प्रकरण हे सुशात सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाशी जोडलं जात होतं. मात्र, सालियन मृत्यूप्रकरणाचा सुशांत सिंहच्या मृत्यूप्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
दिशा सालियन प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी भाजप नेते नितेश राणे यांनीही केली होती. दिशा आणि सुशांत या सगळ्या प्रकरणांचा एकमेकांशी संबंध असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला होता. दिशा सालियानवर अत्याचार झाला आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. या गुन्ह्यात उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरेंचाही समावेश असल्याचा दावा राणेंनी केला होता. पण आता सीबीआयने दिशाचा मृत्यू नेमका कसा झाला हे स्पष्ट केले आहे.
काय आहे प्रकरण?
8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड येथील एका बहुमजली इमारतीवरून दिशा सालियनने उडी मारून आत्महत्या केली असं सांगितलं जात होतं. दिशा ही बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची पूर्वीची मॅनेजर होती. दिशाच्या मृत्यूनंतर 5 दिवसांनी सुशांत सिंग राजपूत याचा त्याच्या राहत्या घरी मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर या प्रकरणात अनेकांची चौकशी करण्यात आली.