हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर सीबीआयसमोर हजर झाले आहेत. त्यांच्यावर पोलीस अधिकाऱ्यांना खंडणी वसूल करण्याचे आदेश दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांची गेल्या अर्धा तासापासून सीबीआयच्या अधिकाऱयांकडून चौकशी केली जात आहे. काही महत्वाच्या आरोपामुळेच देशमुखांना मंत्रिपद सोडावं लागलं होतं. देशमुख आजच्या चौकशीला कसे उत्तर देतात, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. यावेळी त्यांना काही प्रश्न अडचणीचे ठरू शकतात, असं सूत्रं सांगतात. त्यामुळे देशमुख यांच्या चौकशीकडे आज सर्वांचं लक्ष लागलं आहे.
निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितलं. देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला 40 ते 50 कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवसस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे.
मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात देऊन देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे. टार्गेटनुससार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते, आदी आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केले होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्रं लिहून हे आरोप केले होते.
देशमुखांची अडचण वाढविणारे ‘हे’ आहेत प्रश्न …..
१) परमबीर सिंग यांच्या आरोपांवर म्हणणं काय?
या चौकशीवेळी सिंग यांच्या आरोपांबाबत देशमुख यांचं म्हणणं काय आहे हे आधी जाणून घेतलं जाईल. त्यानंतर त्यांच्यावर सीबीआयकडून प्रश्नांची सरबत्ती केली जाईल. यावेळी देशमुख कशापद्धतीने आपली बाजू मांडतात यावर पुढील प्रश्न विचारले जातील, असं सूत्रांनी सांगितलं.
२) वाझेंना 100 कोटींच्या वसुलीचे आदेश दिले होते काय?
या चौकशीत सीबीआयकडून देशमुख यांना प्रामुख्याने खंडणीप्रकरणीच अधिक प्रश्न विचारले जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. सचिन वाझेंना बार, रेस्टॉरंट आणि इतर व्यापाऱ्यांकडून 100 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते काय? वाझेंना सेवेत घेतल्यापासून त्यांना आतापर्यंत किती रुपये वसूल करण्यास सांगितलं, आदी माहिती देशमुख यांच्याकडून घेतली जाणार आहे.
३) इतर अधिकाऱ्यांना वसुलीचे टार्गेट दिले होते का?
वाझे यांच्याप्रमाणेच पोलीस दलातील इतर अधिकाऱ्यांना वसुलीचे आदेश दिले होते का? दिले होते तर कोणत्या अधिकाऱ्यांना दिले होते आणि किती वसुलीचे आदेश दिले होते? हे प्रश्नही त्यांना विचारले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
४) या वसुली रॅकेटमध्ये कुणाकुणाचा सहभाग
वाझेंना वसुली करण्याचे आदेश कुणाच्या सांगण्यावरून दिले? यात कोणकोणत्या राजकीय नेत्यांचा सहभाग आहे? हा पैसा कुणाला दिला गेला? आदी प्रश्नांची सरबत्तीही त्यांच्यावर होण्याची शक्यता आहे.
५) बदल्यांसाठी अर्थकारण होत होतं का?
विरोधी पक्षाने पोलीस दलातील बदल्यांमध्ये अर्थकारण होत असल्याचा आरोप केला होता. त्याबाबतही देशमुखांना प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अहवालावरूनही देशमुखांना काही प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे.