हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुलाब’ चक्रीवादळाने विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात हाहाकार उडवला आहे. ‘गुलाब’ चक्रीवादळ ज्या राज्यांना धडकले त्या राज्यांना केंद्राने जरुर भरीव मदत करावी. मात्र हे वादळ प्रत्यक्ष न येताही त्याच्या अतिवृष्टीने महाराष्ट्रावर जे भयंकर ‘जलसंकट’ कोसळले आहे त्या महाराष्ट्राचाही विचार करावा. आधी चक्रीवादळ आणि पाठोपाठ अतिवृष्टी अशी संकटांची मालिकाच महाराष्ट्रात सुरू आहे. आता तरी केंद्र सरकार त्याचा विचार करणार आहे का?, असा सवाल शिवसेनेने सामना अग्रलेखातून केंद्राला विचारला आहे.
मराठवाडयासह महाराष्ट्राच्या अनेक भागांत सध्या महापूर, अतिवृष्टीने हाहाकार उडवला आहे. ही आपत्ती ज्या ‘गुलाब’ चक्रीवादळामुळे कोसळली ते आता थंडावले आहे. मात्र त्यामुळे महाराष्ट्रावर मुसळधार पावसाचे संकट कोसळले आणि त्यात शेती, पिकांचे व्हायचे ते नुकसान झालेच आहे. पुन्हा या वादळाचे रूपांतर ‘शाहीन’ या चक्रीवादळात होण्याचा आणि त्यामुळे आणखी काही काळ महाराष्ट्राला अतिवृष्टीचा धोका असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हा धोका मराठवाडय़ाला जास्त सांगितला जात आहे. ही आणखी चिंतेची बाब आहे. असे शिवसेनेन म्हंटल.
मुळात संपूर्ण सप्टेंबर महिना महाराष्ट्र अतिवृष्टी, ढगफुटी, महापूर अशाच संकटांखाली भरडला गेला आहे. ‘गुलाब’ चक्रीवादळ महाराष्ट्रावर ‘निसर्ग’ किंवा ‘तौकते’ चक्रीवादळाप्रमाणे थेट धडकले नाही तर त्याने अतिवृष्टीचा जो तडाखा दिला आहे तो महाभयंकरच आहे. मुंबई, ठाणे, कोकणसह मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, खान्देश अशा सर्वच भागांत या तडाख्याने होत्याचे नव्हते करून टाकले आहे. मराठवाडय़ात तर ‘पाणीच पाणी चहूकडे’ अशी स्थिती आहे. धरणे ओव्हरफ्लो, नद्या कोपल्या, गावे जलमय, तलाव बंधारे फुटले, ठिकठिकाणी महापूर, पूल, रस्ते आणि शेतीही पाण्याखाली गेली आहे.
एरवी पाण्यासाठी आसुसलेल्या आणि दुष्काळी म्हटल्या जाणाऱया मराठवाडय़ाचे हे दुसरे रूप थरकाप उडविणारे आणि काळजी वाढविणारे आहे. मराठवाडय़ातील जवळपास प्रत्येक धरण, बंधारा ‘ओव्हरफ्लो’ झाला आहे. ऑगस्ट महिन्यात 60-70 टक्के भरलेल्या जायकवाडी धरणाचे 27 पैकी 18 दरवाजे प्रत्येकी 6 इंच उघडण्याची वेळ या अतिवृष्टीने आली आहे. त्यामुळे प्रतिसेकंद 10 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग गोदावरीच्या पात्रात होत आहे. आधीच गोदावरी अतिवृष्टीने तुडुंब भरलेली; त्यात पाण्याचा हा विसर्ग! म्हणजे गोदाकाठचा संपूर्ण परिसर आणखी काही काळ धोक्याच्या इशाऱयातच राहणार हे उघड आहे. निसर्गाची लहर म्हणा किंवा ‘गुलाब’, ‘शाहीन’सारख्या चक्रीवादळामुळे आलेली आपत्ती म्हणा, महाराष्ट्रावर सध्या जलसंकटांच कोसळले आहे.
गुलाब’ चक्रीवादळ ज्या राज्यांना धडकले त्या राज्यांना केंद्राने जरूर भरीव मदत करावी. मात्र हे वादळ प्रत्यक्ष न येताही त्याच्या अतिवृष्टीने महाराष्ट्रावर जे भयंकर ‘जलसंकट’ कोसळले आहे त्या महाराष्ट्राचाही विचार करावा. आधी चक्रीवादळ आणि पाठोपाठ अतिवृष्टी अशी संकटांची मालिकाच महाराष्ट्रात सुरू आहे. आता तरी केंद्र सरकार त्याचा विचार करणार आहे काय? असा सवाल शिवसेनेने केला.