हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच केले. त्यांच्या वक्तव्यानंतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका झाली. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्ध पत्रक जारी करत जाहीर माफी मागितली. मात्र, त्यांनी कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर अखेर आज पुन्हा चंद्रकांत पाटील यांनी माफी मागितली आहे. “मी पुन्हा एकदा या विषयात कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर जाहीर माफी मागतो,” असे पाटील यांनी म्हंटले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधत पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त केली. तसेच माफीही मागितली. यावेळी ते म्हणाले की, माझी कोणाविषयी कोणतीही तक्रार नाही. तसेच ज्या कोणाला कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे त्यांची मुक्तता करावी. महापुरुषांच्या महान कार्याविषयी मला मनापासून आदर आहे. त्यांच्याविषयी बोलताना माझ्याकडून बोली भाषेतील शब्द अनवधानाने निघाले, यात मला कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता.
“मी नुकतेच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ज्या पोलीस अधिकाऱ्यांवर व पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे ती तात्काळ मागे घेण्यात यावी. तसेच जर पत्रकारांवर कारवाई करण्यात आली असल्यास तीही मागे घ्यावी, अशी सूचना करतो आहे. माझ्या तोंडावर ज्यांनी शाईफेक केली त्यांच्याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही. माझ्या दृष्टीने ह्या वादावर मी पडदा टाकत आहे. आता हा वाद थांबवावा ही विनंती,” असेही पाटील यांनी म्हंटले आहे.