Wednesday, June 7, 2023

सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादीतील अनेकांच्या ताफ्यात ‘निर्भया’च्या गाड्या; भाजप नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारच्या निर्भया निधीतून महाराष्ट्रात मध्यंतरी गाड्या देण्यात आल्या. मात्र, या गाड्या ‘निर्भया’साठी न वापरता राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या ताफ्यात दिसून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारावरुन विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर चांगलीच टीका करण्यात आली. आता यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गंभीर आक्षेप घेतले असून निर्भया पथकातील गाड्या महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांसह खासदार सुप्रिया सुळे यांच्याही ताफ्यात वापरण्यात आल्या होत्या, असा गौप्यस्फोट वाघ यांनी केला आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आज पत्रकार परिषद घेत निर्भया पथकामधील गाड्यांबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या की, केंद्र सरकारकडून 220 वाहने निर्भया निधीमधून खरेदी करण्यासाठी निधी देण्यात आला होता. महाविकास आघाडी सरकराने त्यांच्या काळात 121 वाहने 94 पोलिस ठाण्यांना दिली. मात्र, 99 वाहने इतर विभागांना वाटण्यात आली.

4 फेब्रुवारी 2022 रोजी वाहने खरेदी करण्यात आलेली होती. 19 मे 2022 रोजी त्याचे इतर विभागांना वाटप करण्यात आले. इतर विभागांना वाटलेल्या 99 मधल्या 9 गाड्या मंत्र्यांच्या दावणीला बांधण्यात आलेल्या होत्या. 12 वाहने व्हीव्हीआयपींच्या ताफ्यासाठी देण्यात आली. यामध्ये छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, सुनिल केदार, सुनिल तटकरे, सुभाष देसाई यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे यांच्याही ताफ्यात निर्भयाची गाडी वापरण्यात आली होती.

दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकारानंतर केंद्र सरकारने 2013 मध्ये ‘निर्भया निधी’ची घोषणा करण्यात आली. या निधीच्या माध्यमातून महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी प्रयत्न केले जावेत, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यांना आणि इतर उपक्रमांना चार चाकी आणि दुचाकी गाड्या दिल्या जात आहेत. मात्र, या गाड्या शिंदे-फडणवीस सरकारने मंत्र्यांच्या, आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरल्याचे समोर आलेले आहे. यावरून चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले आहेत.