हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सर्व पक्षांनी उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे. “राऊत यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी गोव्यातील एक मतदार संघ लढवावा. पंतप्रधान मोदी गुजरातमधून जातात आणि उत्तर प्रदेशातून लढतात तसे तुम्हीही लढा,” असे आव्हान पाटील यांनी दिले.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “संजय राऊतांनी मनोहर पर्रिकरांच्या मुलाबद्दल कशाला भाष्य करायचे? तुमचे तिथे ऐकायला कोण बसलं आहे? आपच्या पक्षाकडे अध्यक्ष आहे पण बाकीच्या पक्षांना अध्यक्ष ठरवण्याची सवय नाही. पर्रिकरांच्या मुलाला भाजपाने तिकीट दिले तर तुम्ही सर्व जण निवडणूक लढणार नाही असे सांगावे.
मनोहर पर्रीकर यांनी 25 वर्षे निवडणूक लढवली होती. मनोहर पर्रीकर यांचा मुलगा उत्पल याने अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी ट्विट करत यावर भाष्य केले. संजय राऊत यांच्या ट्विटवर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देत टीका केली आहे.