पुणे प्रतिनिधी | स्वभावाला औषध नसते हेच खरे. चंद्रकात पाटील यांच्याही स्वभावाला औषध नाही. काही ना काही बोलायची त्यांना सवय आहे. तो त्यांचा स्वभाव आहे. काहीही बोलून संभ्रम निर्माण करणे ही त्यांची जूनीच खोड आहे असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना म्हटले आहे.
अजित पवार हे गुरूपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमाला आले असता ते माध्यमांशी बोलत होते. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधले अनेक नेते भाजपात येण्यास उत्सुक आहेत असा गौप्यस्फोट काही दिवसांपूर्वी पाटील यांनी केला होता. त्यावेळी पाटील म्हणाले होते की, ‘वर्षा’ बंगल्यावर अंधारात आघाडीचे नेते ये-जा करतात. याच विधानाला अजित पवार यांनी उत्तर दिले.
ते म्हणाले की,’वर्षा’ बंगल्यावर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यामुळे लोक स्पष्ट दिसू शकतात. लोकांच्या मनात लोकप्रतिनिधींविषयी गैरसमज निर्माण करून शंकेचे वातावरण तयार केले जात आहे. चंद्रकांत पाटील आता सिनिअर नेते झाले आहेत. सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महत्वाची खाती त्यांच्याकडे आहेत. आम्हीही वेगवेगळी पदे भूषवली आहेत. पण चंद्रकांत पाटील यांना सवयच आहे. प्रत्येकवेळी ते काही ना काही बोलतात. त्यामुळे लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की त्यात आपला लोकप्रतिनिधीही आहे का ? पण तो चंद्रकांत दादांचा स्वभाव आहे. असे अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना म्हटले.