मुंबई । राज्य सरकारच्या थोर महापुरुषांच्या यादीत सुधारणा करून त्यात छत्रपती संभाजी महाराजांचं नावाचा समावेश करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे. थोर महापुरुषांच्या यादीत छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. राज्य सरकारनं यात लक्ष घालून तात्काळ सुधारणा करावी,’ अशी विनंती डॉ. कोल्हे यांनी केली आहे.
खासदार डॉ. कोल्हे यांनी या संदर्भातील बाब सरकारच्या निदर्शनास आणून देत याविषयी ट्विट केलं आहे. ‘महाराष्ट्राच्या ज्वलंत इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांचं योगदान न विसरता येण्यासारखं आहे. मात्र, सरकारनं बनविलेल्या थोर महापुरुषांच्या दिनविशेष यादीत संभाजी राजेंच्या नावाचा उल्लेख नाही. यात सुधारणा व्हायला हवी,’ असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. या ट्विटमध्ये कोल्हे यांनी मुख्यमंत्री कार्यालय व सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटला टॅग केलं आहे.
महाराष्ट्राच्या ज्वलंत इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांचं योगदान न विसरण्याजोगं आहे. शासनाने थोर महापुरुषांची दिनविशेष यादी बनवली आहे त्यात छत्रपती संभाजी राजेंच्या नावाचा उल्लेख नाही. विनंती आहे की त्वरित या बाबतीत लक्ष घालून शासनाने सुधारणा करावी. @CMOMaharashtra @NCPspeaks
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) May 12, 2020
खासदार असलेले डॉ. कोल्हे हे एक उत्तम अभिनेते म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहेत. छोट्या पडद्यावर त्यांनी आतापर्यंत अनेक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेमुळं ते महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले आहेत. दरम्यान, राज्य सरकारच्या थोर महापुरुषांच्या यादीत सुधारणा करून त्यात छत्रपती संभाजी महाराजांचं नावाचा समावेश करावा या डॉ. कोल्हे यांच्या मागणीला नेटकऱ्यांनीही जोरदार पाठिंबा दिला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”