हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. अशातच छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी मराठा आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांसोबत मराठा आरक्षण मिळण्याबद्दल छत्रपती संभाजीराजे यांनी भेट घेऊन चर्चा घडवल्या आहेत. मात्र आता छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या मध्ये मराठा आरक्षणावरून भेट होणार आहे. ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते आहे. यापूर्वी देखील या दोघांच्या मध्ये भेट होणार होती मात्र काही कारणास्तव ही भेट रद्द झाली. मात्र आज छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले पुण्यात भेटणार आहेत अशी माहिती मिळते आहे.
खासदार छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे हे आज पुणे येथे दुपारी एक वाजता भेटणार आहेत. पुण्यातील औंध बाणेर रोडवर असलेल्या एका बंगल्यात ही भेट होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राजे एकत्र का नाही ? असे सवाल उपस्थितीत केले जात होते. पण, आता दोन्ही राजे आज भेटणार असून मराठा आरक्षणाच्या लढ्याला नवे वळण मिळणार का? याकडे संपूर्ण मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत आज सकाळी अचानक अजित पवार यांचा ताफा न्यू पॅलेस कडे वळाला. अजित पवार यांनी श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट घेतली तब्बल तासभर ही बैठक सुरू होती. यावेळी मराठा संघटनेचे काही नेते सुद्धा उपस्थित होते अशी माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे संभाजीराजे यांनी 16 तारखेला कोल्हापुरातून मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या भेटीला आणखीन महत्त्व प्राप्त झाले आहे. आता या दोन्ही राजेंमध्ये मराठा आरक्षणा बद्दल काय चर्चा होणार याकडे तमाम मराठा समाजाचं लक्ष लागले आहे.