हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आक्रमक झालेल्या खासदार संभाजीराजे यांनी मूक आंदोलन सुरू केल्यानंतर सरकारने त्यांच्या बहुतांशी मागण्या मान्य केल्या. यामुळे सदर मागण्यांची पूर्तता करण्यासाठी संभाजीराजे यांनी एक महिन्यासाठी आपलं आंदोलन स्थगित केलं. त्यामुळे काहींनी त्यांच्यावर मॅनेज झाल्याचा आरोप केला. यावर संभाजीराजे यांनी टीकाकराना चोख प्रत्युत्तर देत खडेबोल सुनावलं.
‘मी छत्रपती आहे, मी कसा मॅनेज होईन’ असा सवाल करत संभाजीराजे छत्रपती यांनी आरक्षणाच्या लढाईसाठी स्टंटबाजी करण्याची गरज नसल्याचा टोला लगावला आहे. आंदोलने करण्याचा सर्वांना अधिकार आहे. मात्र जे लोक ठोक मोर्चाची भाषा करत आहेत त्यांनी आधी लक्षात घेतले पाहिजे की त्याचे काय परिणाम होतील. कोरोनाचे संकट आहे, कोल्हापूरकरांनी हे संकट आणखी वाढवलं हा ठपका आपल्यावर बसेल. आणि म्हणूनच नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून आम्ही निर्णय घेत आहोत असे संभाजीराजे यांनी म्हंटल.
मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर आपण आंदोलन सुरू केले. सरकार बरोबर झालेल्या चर्चेत बहुतांशी मागण्या मान्य करण्यात आल्या. कोल्हापुरात सारथीचे उपकेंद्र सुरू केले. अजून सात केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. मागण्या मान्य होत असताना पुन्हा मोर्चे कशासाठी काढायचे? यापूर्वी ५८ मूकमोर्चे काढले आहेत. सरकारला समाजाच्या भावना कळाल्या आहेत. त्यामुळे पुन्हा तेच तेच कशासाठी? लोकांना नाहक त्रास कशासाठी द्यायचा,’ असा सवालही त्यांनी केला.