हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्या दिवशी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या ‘महाविकास आघाडी’ला सरकार स्थापनेची संधी मिळून प्रत्यक्ष शपथविधी झाला. या निमिताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनेतेचे आभार मानले आहेत. “राज्यातील जनतेनं आपलं मानून सरकारला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद! कितीही संकटं येवोत, सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून राज्य सरकार काम करीत राहणार, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती आल्या, पण आम्ही विचलित झालो नाही. बहुतांश कालावधी तर करोनाचा मुकाबला करण्यात गेला आणि आजही या विषाणूने आपलं रूप बदलवून परत एकदा जगासमोर आव्हान उभं केलं आहे. पण पहिल्या दोन्ही लाटांमध्ये आम्ही अतिशय नियोजनबद्ध पावलं टाकली, जसं की देशात पहिल्यांदाच तज्ज्ञ डॉक्टर्सचे राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय टास्क फोर्स निर्माण केले. लहान मुलांमधील संसर्गाची भीती लक्षात घेऊन बालकांसाठी वेगळा टास्क फोर्स उभा केला.
कुठल्याही सरकारची कामगिरी केवळ एका व्यक्तीवर अवलंबून नसते. एक चांगला संघ असेल तर कर्णधाराला बळ मिळतं आणि या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून ही ताकद मला माझे सहकारी, प्रशासन, सर्वसामान्य जनता यांच्याकडून वेळोवेळी मिळाली. आम्ही महाविकास आघाडी म्हणून गेल्या दोन वर्षांच्या काळात जे काम केलं त्यामुळं राज्याची कामगिरी विविध संकटे येऊनही चांगली राहिली आणि याचं श्रेय माझे सहकारी, प्रशासनातील सर्व अधिकारी- कर्मचारी यांचं आहे. राज्यातल्या जनतेनंसुद्धा आम्हाला आपलं मानलं; ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे असं मी समजतो.
राज्यातील जनतेनं आपलं मानून सरकारला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद!
कितीही संकटं येवोत, सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून राज्य सरकार काम करीत राहणार.
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे#२वर्षेमहाविकासाची pic.twitter.com/cODqQfSkTH— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 28, 2021
आज तुलना केली तर, दोन वर्षांपूर्वीची आरोग्य आणि वैद्यकीय यंत्रणा तसेच साधनसुविधा आणि आत्ताच्या सुविधा यात मोठा फरक आहे. करोनाच्या या लढय़ात आपण या सुविधा मोठय़ा प्रमाणावर वाढविल्या आहेतच; शिवाय त्या कायमस्वरूपी झाल्या आहेत, त्यामुळे भविष्यातदेखील विविध रोग आणि साथींचा मुकाबला आपण सक्षमपणे करू शकणार आहोत. प्राणवायू निर्मिती असो, मोठय़ा प्रमाणावर लसीकरण असो, मोठमोठय़ा जम्बो सेंटर्सची उभारणी किंवा यात तंत्रज्ञानाच्या मदतीने काही नावीन्यपूर्णता आणणं असो, राज्यानं देशात निश्चितपणे उदाहरण निर्माण केलं असा विश्वास असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हंटले आहे.