हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दहीहंडी हा हिंदूंच्या सणांपैकी एक महत्वाचा सण होय. मात्र, वाढत्या कोरोनामुळे या सणांसह इतर सण साजरे करण्यावर राज्य सरकारने निर्बंध घातले आहे. मात्र, कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने निर्बंधात शिथिलता दिली. त्यामुळे आता दहीहंडी सण साजरा करण्याची स्वप्ने गोविंदा पथक पाहत होता. त्यावर आता विर्जन पडले आहे. आज दहीहंडीच्या मंडळासोबत झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री ठाकरेंनी कोरोना प्रमाण वाढत असून त्यात कोणत्याही स्वरूपाचा धोका निर्माण होऊ नये म्हणून सार्वजनिक ठिकाणी दहीहंडी साजरी करू नये, असे सांगितले आहे.
आज दहीहंडीच्या गोविंदाच्या पथकांशी व मंडळांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन बैठकीतुन संवाद साधला. यावेळी त्यांनी सार्वजनिक ठिकाणी दहीहंडी साजरी करू नये. त्याला राज्य सरकारकडून परवानगी दिली जाणार नसल्याचे सांगत मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, कोरोनामुळे काही काळासाठी आपले सणवार, उत्सव बाजूला ठेऊन जनतेचे प्राण वाचवण्याला महाराष्ट्राने प्राधान्य दिले हा संदेश आपण सर्व मिळून जगाला देऊया. संयम आणि धीराने अगोदर कोरोनाला हद्दपार करूया.
मागील दीड वर्षांपासून आपण कोरोना विषाणुविरूद्ध लढत आहोत, त्यामुळे आपल्यावर आता सण, उत्सव साजरे करण्यावर बंधने आली आहेत, पण ही बंधने कुणासाठी याचा देखील विचार देखील आज करण्याची गरज आहे. या निर्बंधाविरुद्ध आंदोलन करण्याचे काहीजण बोलतात. त्यांनी शासनाविरोधात आंदोलन करण्यापेक्षा कोरोनाविरुद्ध आंदोलन करावे, असे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरेंनी यावेळी केले आहे.