टीम, HELLO महाराष्ट्र। सोमवार पासून संसदेत सुरु असलेल्या वादळी चर्चेनंतर अखेर नागरिकत्व सुधारणा विधेयक बुधवारी मंजूर झाले आहे. लोकसभेत शिवसेनेने विधेयकाच्या बाजूने मतदान केल्याने राज्यसभेत शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर शिवसेनेने राज्यसभेतून विधेयकाच्या मतदानावेळी सभात्याग केला. हा सभात्याग का केला याबद्दल शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
शिवसेनेने केलेल्या सभात्यागाबद्दल राऊत म्हणाले, व्होट बँक मजबूत करण्यासाठी भाजप सरकार हा प्रयत्न करत आहे. शरणार्थी लोकांना मतदानाचा अधिकार देऊ नये, अशी शिवसेनेची भूमिका आहे. तामिळ हिंदू सुद्धा श्रीलंकेमध्ये अत्याचार सहन करत आहेत. त्यांच्याबद्दल कोणतीही भूमिका मोदी सरकारने स्पष्ट केली नसल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.
तसेच कलाम ३७० हटवल्यानंतर काश्मिरी पंडितांचा प्रश्न जैसे थे आहे. आजही या पंडितांना त्यांच्या भूमीत परतता येत नाही, त्यावर मंत्र सरकार काहीच बोलतं नाही आणि बाहेरून शरणार्थी घेण्याची तयारी करत आहे. जम्मू काश्मिरमधील पंडीतांबाबत सरकारकडे कोणतेही उत्तर नाही. त्यामुळे आम्ही सभागृहातून बाहेर पडलो असल्याचे राऊतांनी स्पष्ट केले.