हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वळवले आहे. विशेष म्हणजे भाजप नेत्यांनीही राज ठाकरेंच्या भूमिकेला पाठिंबा देत महाविकास आघाडी आणि प्रामुख्याने शिवसेनेला हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व पाश्वभूमीवर शिवसेनाही आक्रमक झाली असून मनसे आणि भाजपच्या आरोपांना जशास तसे उत्तर देऊन त्यांच्यावर तुटून पडा असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले आहेत
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या प्रवक्त्यांची एक बैठक वर्षा या निवासस्थानी बोलावली होती. त्यावेळी त्यांनी भाजप आणि मनसेच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर द्या असे आदेश दिले आहेत. मनसे आणि भाजपचे हिंदुत्व किती बोगस आहे हे जनतेला दाखवून द्या. हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजप आणि मनसेवर तुटून पडा, असे आदेश उद्धव ठाकरेंनी दिलेत तसेच बाबरी मशीद पडली तेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे कुठे होते, असा प्रश्नही मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, राज ठाकरे हे उद्या औरंगाबादला सभा घेणार आहेत. भाजप नेत्यांचीही अलीकडच्या काळात राज ठाकरेंशी जवळीक वाढली आहे. या दोन्ही पक्षांकडून शिवसेनेला टार्गेट केलं जात आहे. राज ठाकरे हेच हिंदुत्त्वाचे तारणहार आहेत असं वातावरण मनसेकडून केलं जात आहे. या सर्व घडामोडींवर शिवसेनाही प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत असून त्याच पार्श्वभूमीवर मनसेचे हिंदुत्व किती बोगस आहे हे जनतेला दाखवून द्या असे स्पष्ट आदेश उद्धव ठाकरेंनी शिवसेना नेत्यांना दिलेत. त्यामुळे आगामी काळात शिवसेना विरुद्ध मनसे- भाजप ही लढाई पाहायला मिळेल