हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्यावरून देशभरातील शेतकरी आक्रमक झाला असून शेतकऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात आंदोलन पुकारलं आहे. गेल्या 52 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्याचं आंदोलन सुरु आहे. मात्र अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. त्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात शेतकरी आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. कारण येत्या आठवड्यात खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रस्त्यावर उतरणार आहेत. तशी माहिती अल्पसंख्याक विकासमंत्री आणि राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.
मोदी सरकारच्या कृषि कायद्या विरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार रस्त्यावर उतरणार आहेत. केंद्राच्या तिनही कृषी कायद्याविरोधात देशातील सर्व विरोधीपक्ष एकत्र आहेत. तिनही कायद्यांना सर्वोच्च न्यायालयानं सध्या स्थगिती दिली आहे. लोकशाहीत सरकारला कायदे रद्द करण्याचा अधिकार आहे. आज ना उद्या केंद्र सरकारला हे कृषी कायदे मागे घ्यावेच लागतील, असं नवाब मलिक यांनी म्हटलंय.
केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये 15 जानेवारी रोजी पार पडलेली 9 वी बैठकही निष्फळ ठरली आहे. बैठकीत कृषी कायद्यावर तोडगा निघाला नाही. शेतकऱ्यांनी तिन्ही कायदे रद्द झाल्याशिवाय आंदोलनामधून माघार नाही, अशी ठाम भूमिका घेतलेली आहे. तर दुसरीकडे सरकारही मागे हटण्यास तयार नसल्याचं दिसतंय. त्यामुळे हे आंदोलन सुरुच राहणार असल्याचं स्पष्ट झालंय.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’