हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | वाघाचं कातडं पांघरलेली शेळी असते तस भाजपने हिंदुत्त्वाचं कातडं पांघरले असे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील शिवसैनिकांशी दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर घणाघाती हल्ला केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, गाढवं, किंवा काही जनावरं वाघाचं कातडं पांघरतात, असं म्हणतात. तसंच भाजपने हिंदुत्वाचं कातडं पांघरलेलंय. आम्ही हिंदुत्व नाही सोडलेलं. आम्ही हिंदुत्त्वापासून कधीच दूर जाऊ शकत नाही. आम्ही भाजपला सोडलं. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. भाजपचे हिंदुत्व हे सोयीचे आहे.
सत्ता पाहिजे म्हणून इकडे हिंदुत्ववाद्यांशी युती, सत्ता हवी म्हणून मेहबुबा मुफ्ती यांच्याशी युत्ती, सत्ता पाहिजे म्हणून संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीशकुमारांशी युती, सत्ता पाहिजे म्हणून मोदी हटाव या वाक्याला साथ देणाऱ्या चंद्रबाबूंशी युती, हे आपलं हिंदुत्व नाही”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केलाय.
आज आपण ग्प्प बसलो तर देशात गुलामगिरी सुरू होईल. भाजपची आणीबाणी मोडायची तर शिवसेनेसारखा पक्ष दिल्लीत हवा, असे ठाकरे म्हणाले. त्यासाठी इतर राज्यांत शिवसेना वाढवण्याबरोबरच बॅँकांसारख्या सहकारी संस्थांपासून ते स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभेपर्यंतची प्रत्येक निवडणूक ही जिंकायचीच या जिद्दीने लढवावी लागेल असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटल.