हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणेच्या धाडी पडत असताना राष्ट्रवादी काँग्रेसची नरमाईची भूमिका शिवसेनेला पटत नाही अशी माहिती समोर आली आहे. याबाबत स्वतः उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केल्याचे बोललं जातं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील डझनभर नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. त्यावरून आक्रमकपणे भूमिका घेत विरोधी पक्ष भाजपला शिवसेना अंगावर घेत आहे. मात्र राष्ट्रवादीने नरमाईची भूमिका घेतल्याने शिवसेनेच्या गोटात नाराजी आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार याबाबत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली आहे.
भाजपविरोधातील लढाई आम्हीच लढत आहोत. शिवसेनेचे नेते आणि शिवसैनिक फ्रंटफूटवर आहेत. पण त्याचवेळी राष्ट्रवादी मात्र बॅकफूटवर आहे. राष्ट्रवादीने ज्याप्रकारे भाजपशी दोन हात करायला हवेत, तसे त्यांच्याकडून होताना दिसत नाही,’ अशी तक्रार शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याने एक्स्प्रेस सोबत बोलताना सांगितली आहे.
काय आहेत शिवसेनेच्या नाराजीची कारणे-
आधी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यासह शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक, संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मेहुण्यांशी संबंधित कंपन्यांवर कारवाई झाली आहे. केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपविरोधा शिवसेना आक्रमक आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस मात्र नरमाईची भूमिका घेत असल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे.
गतवर्षी, जेव्हा सभापतींना शिवीगाळ केल्यामुळे भाजपाच्या 12 आमदारांना सभागृहातून एका वर्षासाठी निलंबित करण्यात आलं होतं तेव्हादेखील अजित पवारांनी पुन्हा संयमाची भूमिका घेत आमदारांना काही तास किंवा एका दिवसासाठी शिक्षा होऊ शकते, पण १२ महिन्यांसाठी नाही असं म्हटलं होतं.
राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिकांच्या अटकेवरूनही राष्ट्रवादीने घेतलेली भूमिका शिवसेनेला खटकली आहे. एकीकडे नवाब मलिक यांच्या अटकेवरून शिवसेनेने भाजपवर जोरदार टीका केली होती तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आक्रमक भूमिका न घेता शिवसेना आणि भाजपने शांत व्हावं, अशी सामंजस्याची भूमिका घेतली.