हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेने हिंदुत्त्व सोडलं, असा आरोप सातत्याने भाजपकडून सुरू असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील महत्त्वाच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराला हिरवा झेंडा दाखवत विरोधकांचे दात त्यांच्याच घशात घातले आहेत. उद्धव ठाकरे यांनी सांस्कृतिक कार्य विभागाच्या विविध विषयांचा आज आढावा घेतला. यामध्ये प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार, नवीन लेण्यांच्या अनुषंगाने खोदकाम, महावारसा सोसायटीची स्थापना करणे, गड- किल्ल्यांचे संवर्धन इ. विषयांचा समावेश होता.
या 8 मंदिरांमध्ये रत्नागिरीतील धूतपापेश्वर मंदिर, कोल्हापुरातील कोपेश्वर मंदिर, पुण्यातील एकवीरादेवी मंदिर, नाशिकमधील गोंदेश्वर मंदिर, औरंगाबादचे खंडोबा मंदिर, बीडमधील पुरुषोत्तम भगवान मंदिर, अमरावतीमधील आनंदेश्वर मंदिर आणि गडचिरोलीतील महादेवाचे मार्कंडा मंदिर इत्यादी मंदिरांचा समावेश आहे.
यातील एकवीरा देवी मंदिर हे ठाकरे कुटुंबीयांचे कुलदैवत देखील आहे. ते इथं नियमितपणे दर्शनासाठी जातात. धूतपापेश्वर मंदिर सुमारे 1,000 वर्षे जुने आहे, तर कोपेश्वर मंदिर 800 वर्षे जुने आहे. तसेच नाशकातील गोंदेश्वर मंदिर पांडवांच्या काळातील आणि ते ९०० वर्षांपूर्वी बांधण्यात आले आहे.
मंदिराचा जीर्णोद्धार करतांना या मंदिरांचे विकास आराखडे हे मंदिराचे मूळ रुप टिकवून ठेऊन करावे, परिसराचा विकास करतांना भाविकांच्या सोयी- सुविधा, वाहनतळे, स्वच्छतागृहे, जाण्या-येण्याचा मार्ग यांचाही विचार व्हावा तसेच याठिकाणी असलेल्या दुकानांची मांडणीही एकसारखी असावी जेणेकरुन येथे येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळता येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.