हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आजपासून देशवासियांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण, आज लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमेला सुरुवात होत आहे. राज्यात आज २८५ केंद्रावर प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा आज प्रारंभ होणार आहे. प्रत्येक केंद्रावर शंभर या प्रमाणे २८ हजार ५०० लाभार्थ्यांना दिवसभरात लस दिली जाणार आहे, अशी माहिती राज्य लसीकरण विभागातर्फे देण्यात आली.दरम्यान याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला.
कुणाला किती लस द्यायची याचा निर्णय केंद्राचा आरोग्य विभाग घेतो. त्यामुळे कोणत्या राज्याला किती लस दिल्या यात राजकारण करू नका, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. मुख्यमंत्री म्हणून मला जसे देशातील सर्व नागरिक समान आहेत. तसेच पंतप्रधानांनाही देशातील नागरिक समान असतील, असावेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.
केंद्र सरकारने लस देण्यासाठी कुणाला प्राधान्य द्यायचं याच्या सूचना दिल्या आहेत. कोविड योद्धांना लस देण्यासाठी प्राधान्य देण्याच्या सूचना पंतप्रधानांनी केल्या आहेत. नाही तर मीच पहिली लस घेतली असती, असंही त्यांनी सांगितलं. राज्याला अधिकाधिक लसी येतील. जसजसं उत्पादन वाढेल तसतशा लसी येतील. एकदोन कंपन्यांच्या लसही अंतिम टप्प्यात आहेत. त्यांना मंजुरी मिळाल्यानंतर लसींचा साठा वाढेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’