मुंबई । महाराष्ट्रात करोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यावरील उपाययोजनांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या योजनेत फक्त तांदूळ वाटपाचा समावेश आहे. जे लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत, त्यांनाच तांदूळ मिळणार असून केशरी कार्डधारकांना केंद्राने या योजनेतून वगळलं आहे, अशी माहिती देतानाच राज्य सरकारकडून मात्र मध्यमवर्गीयांनाही ८ रुपये प्रति किलो दराने तीन किलो गहू आणि १२ रुपये प्रति किलो दराने तांदूळ दिले जात आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यामुळे केंद्र सरकारने मोफत धान्य वाटप करायला सांगूनही राज्य सरकार धान्य वाटप करत नसल्याच्या भाजपच्या आरोपाला निराधार ठरवत मुख्यमंत्री ठाकरे यांनी उत्तर दिल आहे.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलताना मोफत अन्नधान्य वाटपावरून होत असलेल्या भाजपच्या आरोपांमधील हवा काढून टाकली. केंद्राच्या योजनेत केवळ तांदळाचं मोफत वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे तांदळाचं वाटपही सुरू झालं आहे. मात्र केंद्राने केवळ दारिद्रयरेषेखालील लोकांनाच मोफत तांदूळ वाटप करण्यास सांगितलेलं आहे. त्यात केशरी कार्डधारकांचा समावेश नाही. त्यामुळे मध्यमवर्गीयांना या योजनेचा लाभ मिळत नाही, असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलं.
कोरोनाच्या संकट काळात सर्वच जण अडचणीचा सामना करत असल्याने राज्य सरकारने राज्यातील जनतेला ८ रुपये प्रति किलो दराने ३ किलो गहू आणि १२ रुपये प्रति किलो दराने २ किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याला आणखी धान्य मिळावं म्हणून आम्ही केंद्राकडे मागणीही केली आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. तसेच राज्यसरकार शिवभोजन योजनेतून रोज साडेपाच सहा लाख लोकांना अन्न पुरवत आहे. लोकांच्या तीनवेळच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. गरज पडल्यास आणखी व्यवस्था करू, असेही त्यांनी सांगितलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”