हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात भाजपला शह देण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली. शिवसेना- भाजपची 25 वर्षाची युती तुटली. पण भविष्यात कधी भाजप- आणि शिवसेना एकत्र येणार का असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारले असता त्यांनी स्पष्टपणे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
शिवसेनेने जे केलं ते प्रामाणिकपणे केलं. भाजपशी 25-30 वर्ष युती केली, ती प्रेमाने केली आणि टिकवली. एका दिलाने, विचाराने एकत्र राहिलो. काय घडलं ते तुम्हाला माहिती आहे. आमची युतीतून बाहेर पडण्याची इच्छा नव्हती. युती किंवा आघाडी कशासाठी होते?”युती किंवा आघाडी चांगल्या कामासाठी असेल, कामं होत असतील तर ती का टिकू नये? असा सवाल त्यांनी केला.
आपण कुणीही भविष्यवेत्ते नाही. पण काम करण्याची जिद्द असेल, तर पुढच्या कित्येक वर्षांसाठी जशी काम होईल तशी आघाडी टिकवू शकतो. जशी युती टिकली, तशीच आघाडीही टिकेल. जोपर्यंत आमच्या तिघांच्या मनातला हेतू स्वच्छ आणि प्रामाणिक असेल, तोपर्यंत आघाडी टिकायला काय हरकत आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
तसेच शिवसेना आणि भाजपा पुन्हा एकत्र येणार की नाही, असा सवाल विचारल्यानंतर त्याचं उत्तर दोन्ही पक्ष वेगळे का झाले यामध्ये आहे. एका विचाराने झालेली युती तुटली का, याचं उत्तर शोधावं लागेल, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.