जिल्हाधिकाऱ्यांची फेसबुक रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर आला ‘हा’ मेसेज; लोक झाले हैराण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अकोला : हॅलो महाराष्ट्र – फसवणूक करण्यासाठी लोक अनेक मार्गांचा वापर करत असतात. आता तर लोक सोशल मीडियाचा पण फसवणुकीसाठी वापर करत आहेत. तसेच सोशल मीडियाच्या फेसबुक अकाउंटवर बनावट अकाऊंट बनवून लोकांची फसवणूक केल्याचेदेखील अनेक प्रकरणे घडली आहेत. यामध्ये आता अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या नावाचे बनावट फेसबुक अकाउंट बनवून नागरिकांना पैशाची मागणी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अकोला जिल्हाधिकारी यांनी तक्रार केली असून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

या घटनेमुळे संपूर्ण अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांचे बनावट फोटो तयार करून बनावट फेसबुक अकाउंट करणे आणि त्यांच्या मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याकडे पैशाची मागणी करण्यात येते. अशा बनावट फेसबुक अकाउंट संदर्भात नागरिकांनी सायबर सेलकडे तक्रार केली आहे. सोशल मीडियाचे जेवढे फायदे आहेत, तेवढे नुकसानदेखील आहे. अनेक लोक त्याचा चांगल्या कामासाठी वापर न करता त्याचा चुकीच्या कामासाठी वापर करतात. यामुळे फसवणुकीचे अनेक प्रकार घडत असतात.

यावेळी तर फसवणूक करणाऱ्या लोकांनी चक्क अकोला जिल्हाधिकारी यांच्या नावाने बनावट अकाऊंट बनवून अकोला शहरातील काही प्रतिष्ठित नागरिकांना पैशाची मागणी केली आहे. त्यानंतर काही जणांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. यानंतर अकोला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी तातडीने अकोल्याचे सायबर सेलचे अधिकाऱ्यांशी संपर्क करून माहिती दिली व यासंदर्भात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात हे बनावट फेसबुक अकाऊंट राजस्थानमधील बाडनेर येथील असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

Leave a Comment