काँग्रेसला वाचवायचे असेल तर सामूहिक आणि सर्वसमावेशक नेतृत्वाची गरज; ‘जी- 23’ नेत्यांची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला अपयश आल्यानंतर जी 23 नेते पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर या 23 नेत्यांनी पुन्हा एकदा नेतृत्व बदलाची मागणी केली आहे. काँग्रेसला वाचवायचे असेल तर सामूहिक आणि सर्वसमावेशक नेतृत्वाची गरज आहे असे या नेत्यांनी म्हंटल आहे. तसेच काँग्रेसने सर्व समविचारी शक्तींशी संवाद सुरू करावा अशी मागणी या नेत्यांनी केली आहे

जी 23 मधील नेत्यांची बुधवारी रात्री गुलाम नबी आझाद यांच्या दिल्लीतील घरी एकत्रित आले होते. त्यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह कपिल सिब्बल, आनंद शर्मा, भूपेंद्र सिंह हुडा, मनीष तिवारी, अखिलेश प्रताप सिंह, शशी थरूर, राज बब्बर, कुलदीप शर्मा, प्रणित कौर, एम. ए. खान, शंकर सिंह वाघेला, मणिशंकर अय्यर, पी. जे. कुरियन, राजेंद्र कौर भट्टल, संदीप दिक्षीत या नेत्यांचा समावेश आहे.

G-23 च्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार, आमचा असा विश्वास आहे की काँग्रेससाठी पुढे जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सामूहिक आणि सर्वसमावेशक नेतृत्व आणि प्रत्येक स्तरावर निर्णय घेण्याची प्रणाली स्वीकारणे. भाजपला विरोध करण्यासाठी काँग्रेस पक्ष मजबूत करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणतात. २०२४ ला विश्वासार्ह पर्याय मांडण्यासाठी एक व्यासपीठ बनण्यासाठी काँग्रेसने सर्व समविचारी शक्तींशी संवाद सुरू करावा अशी आमची मागणी आहे.

यापूर्वी देखील या 23 नेत्यांनी ऑगस्ट 2020 मध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना एक पत्र लिहिलं होतं. त्यामध्ये काँग्रेसला सक्रिय अध्यक्षाची गरज असून त्याची नियुक्ती वेळ न दवडता करावी अशी मागणी केली होती. तसेच पक्षाला सातत्याने येत असलेल्या अपयशावर चर्चा करावी अशीही विनंती त्यांनी केली होती.