औरंगाबाद – कोरोना आणि ओमायक्रॉन विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व या आजारावर नियंत्रणासाठी उपयोगी ठरणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसीचा तिसरा डोस (बूस्टर) जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज घेतला. यावेळी त्यांनी शासकीय यंत्रणेतील फ्रंटलाईन वर्कर, आरोग्य यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, सहविकार असलेले नागरिकांनी दुसऱ्या डोसला 9 महिने पूर्ण झाल्यानंतर लशीचा तिसरा डोस घेण्याचे आवाहन केले.
कोविड अनुरूप वर्तनाचे तंतोतंत पालन करावे. कोरोना संसर्गापासून बचावासाठी मास्क परिधान करणे, शारीरिक अंतर राखणे, वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. त्याचबरोबर 15 ते 18 वयोगटातील मुलांनीही प्रतिबंधक लस घ्यावी. कोरोनापासून बचाव होण्यासाठी लस अत्यंत महत्त्वाची आहे, असेही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी यावेळी सांगितले. लस घेतल्यानंतर जिल्हाधिकारी चव्हाण यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयातील सुविधांची पाहणी केली. त्याचबरोबर सीटी स्कॅन यंत्राची पाहणीही त्यांनी केली.
जिल्हा सामान्य रूग्णालयात जिल्हाधिकारी यांनी बूस्टर डोस घेतला. याप्रसंगी जिल्हा सामान्य रूग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, श्रीमती संगीता चव्हाण, संगीता सानप, लसीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. महेश लड्डा यांची उपस्थिती होती.