थर्ड अँगल । विकास वाळके
नुकतेच केंद्र सरकारने पेट्रोल अन डिझेलवरील कर कमी केल्याची घोषणा केली आहे. यामुळे आता पेट्रोल ९.५० रुपयांनी तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त झाले आहे. या निर्णयाने सर्वसामान्यांच्या खिशाला थोडाफार ब्रेक लागला आहे. असं असलं तरी भारतातील एका ठिकाणी पेट्रोल अन डिझल भरण्यासाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी काढावी लागते असं म्हटलं तर तुम्हाला विश्वास बसेल काय? पण हे खरं आहे. ईशान्य भारतातील मिझोराम राज्यासोबतच अन्य ठिकाणी पेट्रोल-डिझेल ची नेहमीच टंचाई जाणवते. यामुळे सध्या मिझोराममध्ये पेट्रोल खरेदी करण्यासाठी थेट जिल्हाधिकारी कार्यालयातून परवानगी काढावी लागते. याबाबत महात्मा गांधी फेलोअ विकास वाळके यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर विचार करायला लावणारी एक पोस्ट लिहिली आहे. विकास यांची संपूर्ण पोस्ट आम्ही खाली जोडत आहोत.
विकास वाळके यांची फेसबुक पोस्ट खालीलप्रमाणे –
स्थळ काळानुसार सामाजिक प्रश्न हे बदलत असतात, त्यातल्या त्यात भारता सारख्या भाषिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक विविधता असलेल्या देशात तर बोलायलाच नको. मागील आठवड्यापासून मी काम करत असलेल्या सरचीप जिल्ह्यात पेट्रोल/ डिझेल ची भीषण ची टंचाई निर्माण झाली आहे. मिझोराम ची राजधानी ऐझोल पासून साधारण 130 किमी वसलेला हा जिल्हा आहे. सध्या स्थानिक लोकांना दैनंदिन गरजांसाठी पेट्रोल/ डिझेल हवं असेल तर जिल्हाधिकारी कार्यालयातुन परवानगी घ्यावी लागते. इतर भारतात इंधन दरवाढी आणि महागाई विरोधात सर्वत्र बोललं जातं असताना, इथेमात्र तुमच्याकडे खिशात पैसे असले तरी तुम्ही विना परवानगी पेट्रोल/ डिझेल घेऊ शकत नाही. मागील काही दिवसांपासून इंधन पुरवठा मागणी इतका होत नाहीये. अनेक जिल्ह्यात देखील सध्या हीच स्थिती आहे.
मिझोराम राज्याला आसाम मधून रस्ते मार्गे पेट्रोलियम पदार्थाचा पुरवठा केला जातो. येत्या काही दिवसांत साखर, तेल आणि इतर किराणा वस्तूंची कमतरता निर्माण होण्याची चिन्हे आहेत. आसाम मध्ये सुरू असलेल्या पूर स्थितीमुळे एकूणच जनजीवन विस्कळीत झाले आहे. मिझोराम ला लागून असलेल्या आसाम मधील काचर, आणि हेलकांडी हे जिल्यांमध्ये पुरामुळे परिस्थिती गंभीर बनलेली आहे. आसाम मध्ये साधारण 7 लाख लोकांना पुरामुळे स्थलांतर करावं लागल्याचं बोललं जातंय.
एकूणच मिझोरम राज्या बद्दल बोलायचं झालं तर भौगोलिक स्थितीमुळे येथे दळणवळणाची साधने ही जेमतेम आहेत. मिझोराम हे राज्य अजुणही रेल्वे ने इतर राज्यांना जोडलेले नाहीये त्यामुळे संपूर्ण मालवाहतूक हे रस्ते मार्गे होते. त्यातल्या त्यात इकडे पाऊस जास्त पडत असल्याने पावसाळ्यात दरड कोसळून रस्ता जाम होण्यासारखे प्रकार मोठ्या प्रमाणात होतात.
मोदी सरकारचा मोठा निर्णय! पेट्रोल 9.50 तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त; गॅस सिलेंडर 200 रुपयांनी स्वस्त
त्यामुळं संपूर्ण पणे आसाम वरून येणाऱ्या मालवाहतुकीवर अवलंबून असलेल्या ह्या राज्यातील मूलभूत गोष्टींच्या किमती देखील या वाहतुकीवरच अवलंबून राहतात. जसं की इथे मध्यम आकाराचा कांदा किव्हा चिंगळी हा किलो ला 50 ते 60 रुपये भावाने मिळतो, मिझो लोकांच्या आहारातील बटाटा हा आसाम वरूनच येतो त्याची ही किंमत ही किलो मागे 80 ते 90 रु असते. त्यात आणखी पावसाळ्यात याची किंमत वाढण्याची शक्यता असते.
कोरोना काळानंतर जगभर Global Value Chain वर बोललं जातंय, याकाळात एकूणच जगभर मूलभूत गोष्टींचा तुडवडा जाणवत होता बहुदा भारता सहित अनेक देशातील लोकांना दवाखान्यात आणि जगण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गोष्टी वेळेत उपलब्द न झाल्याने जीव गमवावा लागल्याचे संबंध जगानं अनुभवलंय.
ईशान्य भारतातील बहुतेक राज्यांत मात्र ही स्थिती अनेक दशकांपासून आहे त्यात विजेपासून ते अगदी पिण्याच्या पाण्या ची टंचाई आढळते. अगदी मूलभूत गोष्टी मिळवण्यासाठी येथील लोकांचा संघर्ष हा पाचवीला पुजलेला आहे.
ईशान्य भारतातील दक्षिणेला मिझोराम सोबत, त्रिपुरा राज्यात देखील मूलभूत गोष्टींची टंचाई सदृष्य स्थिती आहे. येत्या काही दिवसांत परिस्थिती आणखी आव्हानात्मक होण्याची शक्यता आहे. एक राष्ट्र म्हणून संबंध प्रदेशाचा समतोल विकास व्हावा हे राज्य संस्थेचे कर्तव्य असते. परंतु एकूणच ईशान्य भारतातील प्रत्येक राज्यातील परिस्थिती पाहता आणि अनेक दशकांपासून मूलभूत विकासा पासून हजारो मैल लांब असलेला येथील प्रदेश पाहता, आपण आणि राज्य संस्था सपशेल अपयशी ठरलेली दिसते. मुख्य माध्यमं आणि वृत्तपत्र यांमध्ये येथील प्रश्नांना किती जागा मिळते हा तर वेगळाच चर्चेचा मुद्दा आहे.
आज ओढवलेली परिस्थिती ला प्रत्येक वर्षी प्रमाणे येथील माणूस धैर्याने सामना करेलच. इतरवेळेस राष्ट्रभक्तीने अभिमानाने ऊर भरून येत असताना या प्रश्नांवर बोलायला आपल्यातील संवेदनशीलता मेलेली आहे का हा ही प्रश्नच पडतो ? मुख्य प्रवाहापासून भौगोलिक दृष्ट्या दूर असलेला हा प्रदेश मनाने देखील उर्वरतीत भारता पासून दूर झालेला आहे. ही परिस्थिती कायमस्वरूपी कधी बदलता येईल यावर कधी विचार होईल काय माहित ? आज येथील सामान्य माणूस “आपले अच्छे दिन कधी येणार ” याकडे केव्हापासून डोळे लावून बसला आहे.
विकास वाळके (Mob No : 9673937171)
(लेखक IIM लखनऊ येथे पदव्यूत्तर शिक्षण घेत असून सध्या सरचिप, मिझोराम येथे महात्मा गांधी फेलोअ म्हणून काम करत आहेत.)