हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सांगलीसह संपूर्ण जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने मंगळवारी सायंकाळी होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सांगलीतल्या खणभाग पोलीस चौकीजवळील मित्र मंडळाने मात्र यावर्षी कोरोना व्हायरसच्या प्रतिकृतीचे दहन करून कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी आम्ही सज्ज आहोत असा संदेश दिला.
उत्तर भारतासह अनेक राज्यांमध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. होळीच्या दुसऱ्यादिवशी म्हणजे धुळवडीला रंगपंचमी साजरी केली जाते. महाराष्ट्रातील काही भागात मात्र होळीच्या पाचव्यादिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. सांगलीसह ग्रामीण भागात शेणी आणि लाकडे गोळा करून होळी पेटवण्यात आली. यंदाच्या होळीत मंडळांसोबत अनेकांनी घरासमोर शेणी विकत आणून होळी पेटवली होती.
यावेळी सर्वांनी नारळ आणि पुरणपोळीचा नैवेद्य होळीत दाखवला. सायंकाळनंतर शहरातील अनेक चौकाचौकात होळी पेटवल्याचे चित्र दिसत होते. होळीला फेरा घालत चिमुरड्यांना बोंब मारली. यावेळी टिमक्यांचा आवाज गल्लो गल्ली घुमत होता. होळीच्या निमित्ताने अनेक मंडळातील तरुणांनी परिसर स्वच्छ करत गोळा केलेला कचरा जाळून स्वच्छ भारतचा संदेश दिला.
होळी निमित्त सांगलीतील खणभाग पोलीस चौकीजवळील एका मंडळाने होळीत कोरोना राक्षस अशी प्रतिकृती बनवून त्याचे दहन केले. कोरोना व्हायरसला घाबरून न जाता त्याचा दक्षतेने सामना करून तो नष्ट करा असा अनोखा संदेश यावेळी होळी सणानिमित्त देण्यात आला.